बीकेसीत सायकल स्टॅण्डला जागा देण्यास एमएमआरडीएचा नकार

सामना प्रतिनिधी । मुंबई

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (बीकेसी) सायकल स्टॅण्डला जागा देण्यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नकार दिला आहे. मेट्रोचे दोन प्रकल्प आणि दोन उड्डाणपुलांची कामे बीकेसीमध्ये सुरू असल्याने हे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत यासंदर्भात कोणताही निर्णय घेता येणार नाही असे एमएमआरडीएने म्हटले आहे.

बीकेसीमधील कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीएला लेखी पत्र देऊन वांद्रे स्थानक आणि बीकेसी येथे सायकल स्टॅण्डना जागा देण्याची विनंती केली होती, परंतु बीकेसीमध्ये अनेक प्रकल्पांची कामे सुरू असल्याने तेथील वाहतूक आणि पादचारी मार्ग दुसरीकडे वळवावे लागले आहेत. त्यामुळे सध्यातरी सायकल स्टॅण्डला जागा देता येणार नाही असे उत्तर एमएमआरडीएने दिले आहे.

सायकल ट्रक बनवला मग सायकल स्टॅण्ड का नाही?

बीकेसीमध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी एमएमआरडीएच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सायकल संस्कृती पुन्हा रुजवण्यासाठी एमएमआरडीएने पुढाकार घेतला आहे. बीकेसीमध्ये सायकल ट्रकला जागा दिली आहे, मात्र सायकल स्टॅण्डला जागा दिली जात नाही हे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. सायकल स्टॅण्डला अशी कितीशी जागा लागणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे. २०११ मध्ये एमएमआरडीएने बीकेसीमध्ये १३ किलोमीटर लांबीचा सायकल ट्रकही सुरू केला होता, परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद न लाभल्याने तो बंद केला गेला.

बीकेसीमध्ये कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा ‘मेट्रो ३’ प्रकल्प आणि डी. एन. नगर-बीकेसी-मंडाले ‘मेट्रो-२ बी’ एलिव्हेटेड प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्याचबरोबर बीकेसी-एव्हरार्ड नगर चुनाभट्टी उड्डाणपुलाचेही काम सुरू आहे. येत्या दोन महिन्यांत आणखी दोन उड्डाणपुलांचे काम सुरू करण्यात येणार आहे. बीकेसीत रोज सुमारे दोन लाख लोक कामानिमित्त जातात. तसेच रोज २० हजार वाहनांची वर्दळ असते.