दाऊदचं केंद्राशी सेटिंग, निवडणुकीआधी हिंदुस्थानात आणण्याचा मोदींचा डाव!

सामना ऑनलाईन । मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा लोकसभा निवडणुकीत मिळवण्यासाठी तयारीला लागले असून दाऊदला हिंदुस्थानात परत आणून निवडणूक जिंकण्याचा डाव आखला जात आहे. मात्र यात मोदींचं कर्तुत्व नसून अनेक दुखण्यांनी त्रासलेला दाऊदच स्वत: केंद्र सरकारशी सेटिंग करत असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

देशातील जनतेला लुभावण्यासाठी पंतप्रधान मोदी अधूनमधून काही इव्हेंट्स करत असतात. आधी स्वच्छ भारत, मग नोटाबंदी पण या दोन्ही योजना फसल्या आहेत. मग गुजरातच्या निवडणुकांआधी तिथल्या जनतेला भुलवण्यासाठी बुलेट ट्रेनचं भूमिपूजन या गोष्टी करून झाल्या आहेत. त्यामुळे आता नवीन आणखी काही तरी इव्हेंट शोधतील. लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी दाऊदची खेळी करण्याचं ठरवलं असल्याची माहिती आपल्याला कळाली आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

सोशल मीडिया भाजपच्या अंगाशी आलं आहे!

सोशल मीडियाच्या आधारावर मोदी केंद्रात आले. मात्र आता तोच सोशल मीडिया भाजपच्या अंगाशी येऊ लागल्याने त्याच्यावर विश्वास ठेऊ नका, अशी भाषा अमित शहा करत आहेत. मोदींच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटमधील ४८ टक्के अकाऊंट फेक आहेत, असं संबंधित कंपन्यांनीच जाहीर केलं आहे. तेव्हा खोटं किती काळ टिकणार? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

नोटांचा फक्त रंग बदलला?

नोटाबंदीचा मोठा गाजावाजा केला गेला, पण ९९ टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. मग काळा पैसा गेला कुठे? नोटाबंदीचा फायदा काय झाला? फक्त नोटांचा रंग बदलला, अशी टीकाही त्यांनी वेळी केली.

आधीच्या आणि आताच्या सरकारमध्ये फरक काय?

आधीचे सरकार नुसते भाषणं करायचे आताचेही भाषणंच करतात. मग यामध्ये फरक काय आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.