‘प.रे.’च्या मुख्यालयावर राज ठाकरे यांचा मोर्चा

सामना प्रतिनिधी, मुंबई

एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर २९ सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीत २३ प्रवाशांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेट्रो सिनेमा ते पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट मुख्यालयावर गुरुवारी मोर्चा काढला. सकाळी ११.३० वाजता मेट्रो सिनेमागृहाजवळून हा मोर्चा निघणार होता, परंतु प्रत्यक्षात राज ठाकरे मोर्चासाठी एक तास उशिरा कृष्णकुंज येथून निघाले. त्यानंतर चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेचे मुख्यालय गाठले. पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात राज ठाकरे यांनी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार गुप्ता आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे दोन पानांचे निवेदन दिले. त्यात फेरीवाल्यांना हटविणे, पुलांची रुंदी वाढविणे, महिला प्रवाशांना सुरक्षा पुरविणे, लोकलच्या फेऱ्या वाढविणे, टॉयलेटची संख्या वाढवणे व स्वच्छता अशा सहा प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या.

मोर्चाविरोधात गुन्हा दाखल
परवानगी दिली नसतानाही मोर्चा काढल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेच्या वतीने गुरुवारी मेट्रो सिनेमा ते चर्चगेट स्थानकादरम्यान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला कोणतीही कायदेशीर परवानगी देण्यात आली नव्हती. तरीही रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण झाला तसेच पोलीस आयुक्तांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.