लोकल कुठे पोहचली, हे मोबाईल अ‍ॅपवर समजणार; जीपीएस आधारीत ‘लाईव्ह लोकेशन’ फिचर्सचा समावेश

रेल्वेने त्यांच्या लांबपल्ल्यांच्या ट्रेनमध्ये जीपीएस तंत्रावर आधारित ‘लोकेशन ट्रॅकर’ बसविण्याचा प्रयोग काही वर्षांपूर्वी केला होता. आता लोकल ट्रेनमध्येही जीपीएस तंत्र वापरण्यात येणार असून यात्री अ‍ॅपवर प्रवाशांना ट्रेनचे लाईव्ह लोकेशन समजणार आहे. उपनगरीय लोकल प्रवाशांच्या सुविधेसाठी लांबपल्ल्यांच्या काही मोजक्या ट्रेन इंजीनांमध्ये जीपीएस ट्रॅकर बसविण्यात आला असून त्यामुळे ट्रेनचे लाईव्ह लोकेशन समजण्यास मदत होते. अपघात स्थळी तातडीने मदत पोहविण्यासाठी या तंत्राचा उपयोग होण्याबरोबरच ट्रेनचे रियल टाईम लोकेशन मिळत असते.

लोकलचे लाईव्ह लोकेशन समजण्यासाठी रेल्वेच्या ‘यात्री अ‍ॅप’मध्ये आता लाईव्ह लोकेशन फिचर्सचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आपली लोकल कुठे पोहचली ते समजण्यास मदत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या लाईव्ह लोकेशन फिचर्सचे बुधवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्यासमोर सादरीकरण होणार असून त्यानंतर ते प्रवाशांना वापरता येणार आहे. एम इंडिकेटर या खाजगी मोबाईल अ‍ॅपमध्ये ‘लाईव्ह लोकेशन’ हे फिचर्स 2019 पासून असून त्याचा उपयोग प्रवाशांना लोकल नेमकी कुठपर्यंत पोहचली, किंवा ती लेट आहे का ? हे समजण्यासाठी होत आहे.