‘साहो’च्या सेटवरही बाहुबली स्टाईल मोबाईल बंदी

सामना ऑनलाईन । अबुधाबी

बाहुबलीच्या यशानंतर अभिनेता प्रभास त्याच्या ‘साहो’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक व पोस्टर रिलिज झाल्यानंतर प्रभासच्या चाहत्यांची या चित्रपटासाठीची उत्सुकतता फार वाढली आहे. त्यामुळे या चित्रपटातील त्याचे इतर लूक चाहत्यांपर्यंत पोहचू नये म्हणून साहोच्या निर्मात्यांनी बाहुबली चित्रपटासाठी ठेवलेली तशी कडक सुरक्षा यंत्रणा सेटवर तैनात केली आहे. कुठल्याही क्रू मेंबरने प्रभासचे मोबाईलने फोटो काढू नये म्हणून साहोच्या सेटवर मोबाईल बंदी करण्यात आली आहे. सेटवर येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची तपासणी करूनच त्यांनी सेटवर प्रवेश दिला जात आहे.

साहो चित्रपटाची संपूर्ण टीम अबुधाबीला पोहचली आहे. या चित्रपटाच्या शूटींगचे दुसरे शेड्युल सुरू होणार आहे. मात्र चित्रपटाच्या क्रू मेंबरना शूटींगचे लोकेशन देखील सांगण्यात आले नसून त्यांना गाडीने थेट शूटींगच्या ठिकाणी नेले जात आहे. तसेच त्या सेटवरची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. येणाऱ्या प्रत्येकाच्या बॅग तपासल्या जात आहेत. प्रभाससाठी तीन ते चार व्हॅनिटी व्हॅन असून त्याला प्रत्येक सीन नंतर वेगळ्या व्हॅनिटीमध्ये पाठविण्यात येत आहे, असे सूत्रांकडून समजते.