सौरप्लेटच्या सहाय्याने हेल्मेट करणार मोबाईल चार्ज

सामना प्रतिनिधी, येवला

चिचोंडी बुद्रुक येथील तीन विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा व बुद्धीच्या जोरावर सौरप्लेटच्या सहाय्याने मोबाईल चार्ज करणारे हेल्मेट तयार केले आहे. अनेक सोयींनी उपयुक्त असे हे हेल्मेट संरक्षणासाठी ही उपयुक्त असल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे. मोटरसायकल चालवताना अपघात होऊन हेल्मेट नसल्याने मृत्यू होणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन या हेल्मटेची आखणी करण्यात आली.

चिचोंडी येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात किरण संतोष पळे इयत्ता नववी, रोहित देविदास मढवई व उमेश नवनाथ पवार हे इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असून यांनी विद्यालयात येणाऱ्या दैनिकात हेल्मेट नसल्याने तरुणाचा अपघातात मृत्यू अशी बातम्या वाचून त्यांनी शासन हेल्मेट सक्ती करूनही लोक हेल्मेट वापरत नसल्याची उदासिनता हेरून यापुढे मोटरसायकल चालविताना हेल्मेट कसे वापरले जाईल, याचा अभ्यास करून या त्रिकुटाने सौरप्लेट, बॅटरी, एलईडी, चार्जर यांचा वापर करून प्रत्येकाला हेल्मेट वापरावे अशी इच्छा तयार होऊन हेल्मेट वापरण्याऱ्यांची संख्या कशी वाढेल व अपघातात मृत्यूला कवटाळणाऱ्यांचे प्रमाण कसे कमी होईल, यासाठी हे कमी खर्चिक व उपयोगी हेल्मेट बनवले आहे. यासाठी त्यांना मुख्याध्यापक श्री. आर. डी. पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.

एकदा डोळ्यासमोर कानाला मोबाईल चालू डोक्यात हेल्मेट नाही यामुळे झालेला अपघात पाहिला यात युवकाचा झालेला मृत्यू बघितला अन् शासनाने कायदे करूनही लोक हेल्मेटबाबत उदासीन असून ते कसे वापरले जाईल, यासाठी आम्ही हेल्मेटलाच सौरप्लेटच्या सहाय्याने मोबाईल चार्ज करता येईल असे ठरवले व ही कमी खर्चिक पण गरजेची कल्पना सुचली व तसे पेटन्ट तयार केले.