कॅमेऱ्याबरोबर आता पोलिसांच्या मोबाईलचाही वॉच

सामना प्रतिनिधी । मुंबई

नवीन वर्षाचे स्वागत करताना थर्टी फर्स्टच्या रात्री कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांच्या सुट्ट्य़ा रद्द करण्यात आल्या असून एसआरपीएफ, क्यूआरटीच्या पथकांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, हॅण्डी कॅमेरे याचबरोबर पोलिसांच्या मोबाईलचाही गर्दीत कायदे मोडणाऱ्यांवर वॉच असेल. झोपडपट्ट्य़ांसह उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले असून साध्या वेशातील गस्तही वाढविण्यात आली आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत रात्रभर जल्लोष सुरू असतो. ठिकठिकाणी मुंबईकरांसह पर्यटकही मोठ्य़ा प्रमाणात गर्दी करतात. या गर्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अख्खे मुंबई पोलीस दल ऑनड्य़ुटी असेल. पोलिसांच्या सुट्ट्य़ा रद्द करण्यात आल्या असून एसआरपीएफ, क्यूआरटीची अतिरिक्त कुमक असेल अशी माहिती पोलीस प्रवक्ते उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.

छेडछाड रोखण्यासाठी महिला पोलिसांची विशेष पथके
महिलांची छेडछाड रोखण्यासाठी महिला पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी या पथकाकडेही कॅमेरे देण्यात आले आहेत. बहुतांश पोलिसांकडे मोबाईल आहेत. या मोबाईलवरूनही त्यांना एखाद्या घटनेचे शूटिंग करता येईल. तोही आमच्यासाठी पुरावा ठरू शकतो असे देवराज म्हणाले.

…तर हॉटेलवाल्यांचे परवाने रद्द
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर हॉटेल तसेच बार मालकांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे सांगतानाच देवराज म्हणाले, हॉटेलवाल्यांनी कायदा मोडल्यास किंवा त्यांच्यामुळे कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यांचे परवाने रद्द केले जातील, अशी ताकीद देण्यात आली आहे.
– मुंबईतील संवेदनशील ठिकाणी करडी नजर ठेवण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी येथे स्पॉटवर असेल.
– दारुड्य़ा चालकांना पकडण्यासाठी ब्रेथ ऍनलायझरची संख्या तिपटीने वाढवून ती १५० केली आहे.
– किनाऱ्यांवरही गस्त वाढविण्यात आली आहे. एटीएस तसेच बॉम्बशोधक व नाशक पथके ही सज्ज आहेत.