उद्योजकांना स्टार्टअपसाठी नवे दालन, ठाण्यात अत्याधुनिक ‘ग्लोबल इम्पॅक्ट हब’

सामना ऑनलाईन । ठाणे

सध्या स्टार्टअप व्यवसायाची जोरदार चर्चा असली तरी या व्यावसायिकांना खऱ्या अर्थाने चालना देण्याचे काम ठाणे महापालिका करणार आहे. पालिकेच्या माध्यमातून रुस्तमजी टाऊनशीपमध्ये अत्याधुनिक ग्लोबल इम्पॅक्ट हब उभे राहणार असून या हबमध्ये नामांकित उद्योगांच्या माध्यमातून संशोधन व विकास सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे हॉस्पिटॅलिटी, रिअल इस्टेट आणि लघुउद्योग अशा व्यवसायांना खऱ्या अर्थाने पाठबळ मिळणार असून मोठ्य़ा प्रमाणावर नोकऱ्यांची निर्मितीही होईल.

राज्यात स्टार्टअप धोरणाशी सुसंगत असलेल्या प्रकल्पांची निर्मिती खासगी व सार्वजनिक भागीदारीतून करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी स्टार्टअप प्रकल्पातील तज्ञ आणि अनुभवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एक कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या अटी आणि शर्तींचा मसुदा अंतिम करण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी रुस्तमजी गृहसंकुलातील टाऊनशीपमध्ये उभारण्यात येणाऱ्या ग्लोबल इम्पॅक्ट हबच्या आराखड्य़ाबाबत चर्चाही करण्यात आली. या हबच्या आराखड्य़ात काही किरकोळ बदल करून हा वास्तू आराखडा गुरुवारपर्यंत सादर करा, अशा सूचना संजीव जयस्वाल यांनी दिल्या.

– हा हब सेल्फ फायनान्स तत्त्वावर चालविण्यात येणार आहे.

– या ठिकाणी उपलब्ध जागेपैकी काही जागांवर व्यावसायिक व उद्योजक यांच्यासाठी अद्ययावत सुविधांनी युक्त कार्यालये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

– ज्यांना मोठी कार्यालये परवडणार नाहीत अशा उद्योजकांना डेस्क स्पेस भाडेतत्त्वावर घेता येईल.

– स्थानिक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनाचे प्रदर्शन भरवता यावे यासाठी भाडेतत्त्वावर जागा मिळेल.

– स्थानिक उद्योग, व्यावसायिक संस्था यांच्या बैठकांसाठी भाडेतत्त्वावर जागा मिळेल.