तोगडियांविरोधात पंतप्रधान मोदी-शहांचे कटकारस्थान

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

विहिंप नेते प्रवीण तोगडिया यांच्या बाजूने पाटीदार पटेल आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल मैदानात उतरले आहेत. तोगडिया यांच्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा हे कटकारस्थान रचत आहेत, असा थेट आरोप हार्दिक पटेल यांनी केला आहे.

हार्दिक यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन तोगडिया यांची भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना हार्दिक पटेल म्हणाले, प्रवीण तोगडिया यांची अनेक मते मला पटत नाहीत. मात्र त्यांच्याविरोधात कटकारस्थान रचले जात आहे, हे खरे आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्या सांगण्यावरून हे सगळे सुरू आहे.

झेड प्लस सुरक्षा असताना तोगडिया बेपत्ता होतात. मग सामान्य माणसाचे काय होऊ शकते याची कल्पनाही करू शकत नाही. तोगडिया जर डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या काळात बेपत्ता झाले असते तर भाजपने देशभरात हिंसाचार माजविला असता, असे हार्दिक यांनी सांगितले.