जनतेच्या पैशांवर भाजपचे सोशल मीडिया कॅम्पेन?

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उठसूठ ‘मोदी सरकार’च्या जाहिरातबाजीसाठी भाजपकडून जे मीडिया कॅम्पेन चालवले जाते ते जनतेच्याच पैशावर सुरू असल्याचा खळबळजनक दावा एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने केला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये भाजपने एक सोशल मीडिया कॅम्पेन चालवले. त्याचा खर्च सरकारी तिजोरीतून म्हणजेच जनतेच्या पैशातून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला अटक झाल्यानंतर हरयाणात झालेला हिंसाचार रोखण्यात मुख्यमंत्री एमएल खट्टर यांना अपयश आले. त्यानंतर विरोधकांनी खट्टर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावेळी ट्विटरवर #HaryanaWithKhattar नावाने जे कॅम्पेन चालवण्यात आले ते भाजपनेच चालवल्याचे एनडीटीव्हीने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

स्वत:ला भाजपचे सोशल मीडिया मॅनेजर म्हणवणाऱ्या भार्गव जैन यांनी #HaryanaWithKhattar कॅम्पेनतंगर्त ९२ मिनिटात ६३ ट्विट केले. त्या व्यतिरिक्त अहमदाबाद येथील सिल्वर टच टेक्नोलॉजी या कंपनीचे मॅनेजर म्हणून ते २०१६ डिसेंबर पासून काम पाहात आहेत. या कंपनीची स्थापना १९९२ साली करण्यात आली असून ही कंपनी जैन यांसारख्या व्यक्तींना कामावर ठेवते. त्यांच्याकडून आपली कामे करून घेते. ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी ग्रुप, हिताची आणि निरमा ग्रुप सारख्या मल्टीनॅशनल कंपन्यांसाठीही काम करते, असेही एनडीटीव्हीने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

सिल्वर टच ही कंपनी फक्त भाजपसाठी काम करत आहे, असे या कंपनीत काम करणाऱ्या मनोज नामक कर्मचाऱ्याने सांगितले आहे.