मोदी सरकार गेम चेंजर नव्हे, केवळ नेम चेंजर आहे; काँग्रेसची टीका

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रातील मोदी सरकारवर काँग्रेसनं हल्लाबोल केला आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या राज्यसभेतील पहिल्या भाषणानंतर विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपवर जोरदार टीका केली. हे सरकार गेम चेंजर नव्हे तर नुसतेच नेम चेंजर आहे, अशा शब्दात गुलाम नबी आझाद यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे.

केंद्रातील भाजप सरकारनं सुरू केलेल्या योजना केवळ नावापुरत्या असल्याचं गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं. तसेच मोदी सरकारनं काँग्रेस पक्षानं आपल्या कार्यकाळात सुरू केलेल्या योजनांची केवळ नावं बदलून आपल्या नावावर केल्याचा आरोपही त्यांनी संसदेत बोलताना केला.

गुलाम नबी आझाद आपल्या भाषणात म्हणाले की, ” १९८५ नंतर काँग्रेस सरकारनं सुरु केलेल्या अनेक योजनांची केवळ नावं बदलली आहेत. केंद्रातील भाजप सरकार प्रत्येक योजना सुरू करताना सांगता की आमचे सरकार गेम चेंजर आहे. मात्र तसे काही नसून, हे सरकार केवळ नेम चेंजर आहे.”