‘राफेल’साठी मोदी सरकारनेच रिलायन्सचे नाव सुचवले!


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘राफेल’ लढाऊ विमाने खरेदी करारावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला घेरले असतानाच फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राफेल करारासाठी मोदी सरकारनेच उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्सच्या नावाचा प्रस्ताव पाठविला होता असे ओलांद यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. 2015 मध्ये ओलांद फ्रान्सचे राष्ट्रपती होते. त्यांच्या काळातच 36 राफेल फायटर जेट खरेदीचा करार मान्य करण्यात आला होता. 7.87 अब्ज युरोचा हा करार आहे.

दॅसॉ एविएशन आणि रिलायन्समध्ये झालेला करार व्यावसायिक होता. या करारात सरकारची भूमिका नव्हती असा दावा मोदी सरकारकडून करण्यात येत आहे. पण माजी राष्ट्रपती ओलांद यांच्या गौप्यस्फोटामुळे सरकार उघडे पडले आहे. विरोधक सरकारला आणखी घेरण्याची शक्यता आहे.

फ्रान्समधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत माजी राष्ट्रपती ओलांद यांनी हा सनसनाटी गौप्यस्फोट केला आहे. हिंदुस्थानच्या कोणत्या कंपनीची निवड राफेल करारासाठी करावी यामध्ये फ्रान्सच्या ‘दॅसॉ एविएशन’ची कोणतीही भूमिका नव्हती. हिंदुस्थान सरकारने अनिल अंबानी यांच्या रिलायन्सचे नाव दिले. त्यानुसार ‘दॅसॉ एविएशन’ने रिलायन्सशी संपर्क केला. आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता असे ओलांद यांनी स्पष्टपणे सांगितले.

माजी राष्ट्रपती ओलांद यांचे आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्तिशः मध्यस्थी करून पूर्वीचा राफेल करार बदलला हे स्पष्ट झाले आहे. त्यांनी हे सगळे व्यवहार बंद दाराआड केले. मोदींनी देशाला धोका दिला. शहीद जवानांचा अपमान केला आहे.
-राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

वारेमाप खोटे बोलणारे सरकार कसे सहन करायचे?
-यशवंत सिन्हा, बंडखोर ज्येष्ठ भाजप नेते

मित्रों..‘राफेल’ सौदे के घालमेल और तालमेल की सही जानकारी 125 करोड देशवासीयों को मिलनी चाहिए की नही? जर उद्योगपतींना सामील असलेले पंतप्रधान भागीदार आणि गुन्हेगार नसतील, ते इमानदार चौकीदार असतील तर सत्य सांगण्यात भीती कसली आहे?
-लालूप्रसाद यादव- अध्यक्ष, राष्ट्रीय जनता दल

पंतप्रधान मोदीजी, खरे बोला! देश सत्य जाणू इच्छित आहे. पूर्णसत्य. केंद्र सरकारचे म्हणणे रोजच खोटे पडत आहे. जनतेला पक्की खात्री पटलीय की, गडबड नक्कीच आहे. तसे नसते तर सरकार रोज निरनिराळय़ा खोटय़ा गोष्टी का सांगतंय?
-अरविंद केजरीवाल- मुख्यमंत्री, दिल्ली

summary- modi-govt-suggest-reliance-for-rafael-deal-says-francois-hollande