मोदी २०३०मध्ये चंद्र पृथ्वीवर आणणार!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बंधु-भगिनींनो २०२८मध्ये गुजरातमधील प्रत्येक व्यक्तीला चंद्रावर एक घर मिळेल आणि २०३० मध्ये मोदी चंद्रालाच पृथ्वीवर घेऊन येतील, अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या ‘वचनबाजी’ची खिल्ली उडवली आहे. गुजरात दौऱ्यात नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका करणाऱ्या राहुल गांधी यांनी ट्विटरवरून देखील सरकारला लक्ष्य करणे सुरू ठेवले आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर काँग्रेसने प्रचंड जोर लावला असून राज्याच्या विविध भागांमध्ये राहुल गांधी यांच्या सभा आयोजित केल्या जात आहेत. तसेच सोशल मीडियावर देखील मोदी आणि भाजप सरकारवर निशाणा साधला जात आहे. बुधवारी रात्री राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदींवर टीकेची झोड उठवली आहे. मोदींचा पक्ष गेली २२ वर्ष गुजरातमध्ये राज्य करत आहे आणि तुम्ही आता म्हणता आहात की २०२२ पर्यंत गुजरातमधील गरीबी दूर करेन, अशा तिखट शब्दात त्यांनी मोदींवर वार केले. २०२५मध्ये गुजरातच्या प्रत्येक व्यक्तीला चंद्रावर जाण्यासाठी रॉकेट देऊ, असे वचन मोदी देतील असा टोलाही त्यांनी ट्विटमधून लगावला आहे.