नोटाबंदी एक फसलेला प्रयोग, विदेशी तज्ज्ञाचे मत

4

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

अमेरिकेतील ‘फॉरेन अफेअर्स’ या मासिकात जेम्स क्रेबट्री यांनी एक लेख लिहून पंतप्रधान मोदी यांनी हिंदुस्थानमध्ये केलेली नोटाबंदी हा एक फसलेला प्रयोग असल्याचा निष्कर्ष काढला आहे. क्रेबट्री हे सिंगापूरच्या के ली कुआन यू स्कूलचे वरिष्ठ रिसर्च फेलो आहेत. त्यांनी आपल्या लेखात नोटाबंदीच्या निर्णयावर सडकून टीका केली आहे.

pic

भ्रष्टाचार, काळा पैसा, बनावट नोटा, दहशतवाद आणि नक्षलवाद या सगळ्याला आळा घालण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशात नोटाबंदी जाहीर केली. हिंदुस्थानमध्ये व्यवहारात असलेल्या ५०० आणि १०००च्या सर्व नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. नंतर ५०० आणि २ हजाराच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या. मात्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेक लघु आणि मध्यम आकाराचे उद्योजक अडचणीत सापडले. देशाच्या आर्थिक प्रगतीला अचानक खीळ बसली. अर्थव्यवस्थेतून ७० टक्क्यांहून अधिक रोख रक्कम तडकाफडकी बाद झाल्यामुळे मंदी आली. विकासाचा वेग मंदावला. अनेक महत्त्वाचे आर्थिक निर्णय लांबणीवर पडले. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल हा अंदाज चुकला.

नोटाबंदीच्या काळात सामान्यांचे, गरीबांचे प्रचंड हाल झाले. तासनतास रांगेत उभे राहून बाद झालेल्या नोटा बँकेत जमा करणे आणि नव्या नोटा मिळवणे यासाठी नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला. प्रामुख्याने रोख रकमेवर अवलंबून असलेली हिंदुस्थानची अर्थव्यवस्था काही काळ ठप्प झाली होती. ही माहिती देत मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयातून ठोस धडा घेतला पाहिजे, असेही क्रेबट्री यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.