मोदींच्या पहिल्याच ऑनलाइन योजनेचा फज्जा, धसई गावचा कॅशलेस बाजार उठला

सामना प्रतिनिधी, मुरबाड

नोटाबंदीच्या बुमरँगनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून आणि राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून जाहीर केलेले महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव म्हणून ठाणे जिल्ह्यातील धसई गावाचा सर्वत्र गौरव करण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः स्वाइप करून तांदूळ विकत घेत या कॅशलेस योजनेचा शुभारंभ केला होता. मात्र डेबिट कार्ड स्वाइपवरील कराचा भुर्दंड, नेटवर्कच्या अडचणी त्यातच बहुतांश नागरिकांचे नसलेले बँक अकाऊंट या कारणाने काही दिवसांतच येथील कॅशलेसचा बाजार उठला आहे. सर्वच ठिकाणी रोखीने देवाण-घेवाण सुरू असून ऑनलाइन व्यवहाराअभावी शेकडो दुकानांमधील स्वाइप मशीन्स धुळ खात पडून आहेत. त्यामुळे मोदींच्या पहिल्याच ऑनलाइन योजनेचा अक्षरशः फज्जाच उडाला आहे.

८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाचशे आणि एक हजारची नोटबंदी जाहीर करून सर्वत्रच हडकंप उडवून दिला होता. या नोटबंदीने काळापैसा बाळगणाऱ्यांना हादरा बसेल अशी जाहिरातबाजी त्यावेळी भाजप सरकारने केली. मात्र त्याचे उलटे परिणाम अल्पावधीतच जाणवू लागल्याने ही नोटबंदी केंद्र सरकारच्या अंगलट येऊ लागली. त्यामुळे सरकारने नोटबंदीच्या मुद्द्यावरून देशवासीयांचे लक्ष विचलित व्हावे म्हणून ऑनलाइन व्यवहारांना चालना देण्यास सुरुवात केली. यासाठी लाखो रुपये खर्चून जाहिरातबाजीही केली.

धसई जगाच्या नकाशावर झळकले
कॅशलेसचे फायदे त्यामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांना कसा चाप बसू शकतो याचे रकानेच्या रकाने भरून जाहिराती देऊन माहिती देण्यात आली. यातूनच मुरबाड तालुक्यातील धसई गाव अचानक प्रकाशझोतात आले. देशातील दुसरे कॅशलेस गाव म्हणून सरकारने धसईचा गौरव केला. ब्युटीपार्लरपासून स्टेशनरीपर्यंत तर किराणापासून हॉटेल, केशकर्तनालयापर्यंत सर्वत्र कॅशलेस व्यवहार सुरू करण्यात आले. या योजनेचे उद्घाटन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः केले. त्याअगोदर ठिकठिकाणी होर्डिंग्ज आणि न्यूज चॅनल, पेपरमधून जाहिराती देऊन वातावरणही तयार करण्यात आले. त्यामुळे एरवी कुणाच्या गावीही नसलेले धसई जगाच्या नकाशावर आले.

मुनगंटीवारांचे तांदूळ आणि शेवटचा व्यवहार
धसईतील कॅशलेस योजनेचे उद्घाटन करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना हाताशी धरून भाजपने बैलगाडीवरून मोठी मिरवणूक काढून त्याची डॉक्युमेंट्री बनविली. त्याचवेळी स्वतः अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका दुकानात जाऊन स्वतःचे डेबिट कार्ड स्वाइप करून दोन किलो तांदूळही विकत घेतले. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे मुनगंटीवारांचा हा पहिला आणि शेवटचा कॅशलेस व्यवहार ठरला असल्याचे तेथील व्यापारी सांगत आहेत.