‘हा’ पाकिस्तानी फिक्सर आता दुबईत खेळणार

सामना ऑनलाईन । कराची

पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज मोहम्मद आसिफ दुबईमध्ये १९ ते २३ मार्चदरम्यान खेळल्या जाणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहे. दुबईच्या शाहजाह क्रिकेट स्टेडियममध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण १५ संघ सहभागी होणार आहेत. आसिफ पाकिस्तानी संघ शहेनशाह वॉरिअर्सकडून खेळणार आहे.

आसिफ पाकिस्तानकडून २३ कसोटी, ३८ एकदिवसीय, ११ टी-२० सामने खेळला आहे. २०१०मध्ये लॉर्ड्स कसोटीमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्याने आसिफचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर संपुष्टात आलं. आयसीसीनं त्याच्यावर २०११ मध्ये सात वर्षाची बंदी घातली होती. त्यानंतर मात्र आसिफचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झालं नाही. त्यासोबत फिक्सिंगमध्ये अडकलेल्या मोहम्मद आमिरचा मात्र आता पाकिस्तानी संघात समावेश झाला.