पाचलेगांवकर महाराज आणि स्वा. सावरकर

>>मोहन श. कुळकर्णी<<

सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ व राष्ट्रनिष्ठ विचारांचा चांगलाच प्रभाव पाचलेगांवकर महाराजांवर होता. या दोन महान व्यक्तिमत्त्वांची खामगांवी भेट होणार होती. एक स्वातंत्र्यवीर होते तर एक धर्मभास्कर होते, एक राष्ट्रभक्त होते तर एक राष्ट्रसंत होते. दोघांच्याही अंतरी हिंदुराष्ट्र, हिंदुधर्म व हिंदू जनता यांच्याविषयीच्या प्रेमाची ज्योत अखंड तेवत होती व दोघांनीही स्वराष्ट्र व स्वधर्मासाठी आपले आयुष्य ईशचरणी समर्पित केले होते!

स्वा. विनायक दामोदर सावरकर १९४२मध्ये तीन दिवस   खामगांवी मुक्कामी होते. या महान क्रांतिकारकाने खामगांवला तीन दिवसांचा कालावधी दिला याला कारणही तसेच होते. धर्मभास्कर श्रीसंत पाचलेगांवकर महाराजांनी आपल्या खामगांवच्या श्रीमुक्तेश्वर आश्रमात हिंदू संघटन महायज्ञाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता, त्या यज्ञाच्या समारोपप्रसंगी महाराजांच्या आग्रही निमंत्रणावरून सावरकर खामगांवी आले होते. हे तीनही दिवस स्वा. सावरकर खामगांवचे सुप्रसिद्ध वकील दादासाहेब भडंग यांच्या घरी मुक्कामी होते. विशेष म्हणजे, खामगांव सोडताना सावरकरांनी दादासाहेबांना चांदीचा पेला प्रेमाने भेट म्हणून दिला होता.

वास्तविक, ही एक अलौकिक आणि अद्भुत घटना होती की, एक साधू, एक संत आयोजित करीत असलेल्या यज्ञ कार्यक्रमात, कोणत्याही कर्मकांडाला फारसे काय मुळीच महत्त्व न देणारे सावरकर येतात, तीन दिवस मुक्कामी राहतात आणि शेवटी अतिशय ओजस्वी तेजस्वी व्याख्यान देऊन लक्षावधी लोकांना हिंदुधर्मचेतनेने पेरीत करतात. महाराजांनी आयोजित केलेला यज्ञ हा विश्वशांतीकरिता किंवा नवचंडी महायज्ञ, अतिरुद्र महायज्ञ असा पारंपरिक यज्ञ नव्हता, तर श्रीमहाराजांच्या अद्भुत कल्पनाशक्तीतून व असंघटित हिंदूंना संघटित करण्याच्या अंतस्थ तळमळीतून प्रकट झालेला हा ‘हिंदू संघटन महायज्ञ’ होता. जातीपातींनी खिळखिळय़ा झालेल्या, विकृत रूढींच्या दडपणाखाली गलितगात्र झालेल्या आणि एकूणच विस्कळीत असलेल्या हिंदूंना संघटित करण्यासाठी एखादा यज्ञ असू शकतो हे ना कधी कुणी ऐकले होते न पाहिले होते. पण महाराजांनी ते घडवून आणले व अशा हिंदू संघटन कार्यात सावरकर येतीलच अशी खात्री असल्यानेच महाराजांनी त्यांना निमंत्रण दिले व त्याचा स्वीकार करून सावरकर खामगांवी आले.

या यज्ञाच्या निमित्ताने होणारी या दोघांची भेट ही पहिलीच भेट नव्हती. या आधी म्हणजे ११ सप्टेंबर १९२९ रोजीही सावरकरांच्या खास निमंत्रणावरून पाचलेगांवकर महाराजदेखील रत्नागिरीस गेले होते. रत्नागिरी हिंदुमहासभेच्या १९२९ च्या वार्षिक प्रतिवृत्तात या दोघांच्या भेटीचे हृदयस्पर्शी वर्णन आले आहे. त्या प्रतिवृत्तावरून लक्षात येते की, श्रीमहाराजांची सुद्धा सावरकरांना भेटण्याची तीव्र इच्छा होती. त्यात स्वतः सावरकरांचे निमंत्रण म्हटल्यावर अतिशय आनंदाने महाराज तिथे गेले.

सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ व राष्ट्रनिष्ठ विचारांचा चांगलाच प्रभाव पाचलेगांवकर महाराजांवर होता. महाराज गावोगाव रोज जी सामुदायिक उपासना घेत असत त्यात देवदेवतांच्या मूर्तींसोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचीही प्रतिमा असे व देवदेवतांच्या आरतीनंतर सावरकरांनी रचलेली शिवाजी महाराजांची आरतीही महाराज सर्वांकडून म्हणवून घेत असत. महाराजांच्या ग्रंथालयात सावरकरांचे सर्वच्या सर्व ग्रंथ तर होतेच, परंतु त्यातील उतारेच्या उतारे महाराजांना पाठ होते व ते इतरांकडून पाठही करवून घेत असत असा माझा अनुभव आहे.

त्यामुळे अशी दोन महान व्यक्तिमत्त्वे असलेल्या दोघांची खामगांवी भेट होणार होती. एक स्वातंत्र्यवीर होते तर एक धर्मभास्कर होते, एक राष्ट्रभक्त होते तर एक राष्ट्रसंत होते. दोघांच्याही अंतरी हिंदुराष्ट्र, हिंदुधर्म व हिंदू जनता यांच्याविषयीच्या प्रेमाची ज्योत अखंड तेवत होती व दोघांनीही स्वराष्ट्र व स्वधर्मासाठी आपले आयुष्य ईशचरणी समर्पित केले होते! अशा या तेजस्वी व तपस्वी असलेल्या दोघांची भेट पाहणारे त्या काळातील खामगांववासी किती भाग्यवान असतील! महाराजांच्या या हिंदू संघटन महायज्ञाला अगोदरच प्रचंड गर्दी झाली होती. त्यात पुन्हा धर्मभास्करांच्या यज्ञाला स्वातंत्र्यवीर येणार म्हटल्यावर गर्दीला पारावार राहिला नाही. समारोपाच्या कार्यक्रमात श्रीमहाराजांनी आपल्या तेजस्वी वक्तृत्वाने सर्वांना मंत्रमुग्ध करीत आपल्या हिंदुसंघटन महायज्ञामागील कल्पना विशद केली व आपल्या व्याख्यानाची सांगता करताना आपल्या आगळय़ावेगळय़ा शैलीने स्वातंत्र्यवीरांचा परिचय देऊन त्यांचा गौरव केला आणि नंतर तो महन्मंगल क्षण आला. सावरकर बोलू लागले…

यज्ञांचे पूर्वापार महत्त्व सांगताना ते म्हणाले, “हिंदू संस्कृतीत यज्ञसंस्थेचे कार्य फार महत्त्वाचे आहे. साम्राज्य निर्मिल्यानंतरचे अश्वमेध यज्ञ आणि शांतीकाळातील राजसूय यज्ञ याचे वर्णन आपण ऐकलेच असेल. ग्रीकांचा पराभव करणारे चंद्रगुप्त, हूणविजेते विक्रमादित्यांनीही दिग्विजयी यज्ञ केले होते.’’ “यज्ञाच्या ज्वाला या अंतःकरणातील धगधगत्या स्वाभिमानाचे प्रतीक असून शत्रूचे निर्दालन करणे याच त्या यज्ञाग्नीत भस्म होणाऱया समिधा होत. हिंदुराष्ट्राच्या आजच्या परिस्थितीत अशाच काही समिधांचा होम करणे अवश्य आहे.’’

त्या समिधा कोणत्या? तीळ-तांदळाच्या समिधा यज्ञात टाकायला का सावरकर सांगणार होते? हिंदू संघटन महायज्ञाची देवता प्रसन्न व्हायला या पारंपरिक समिधा कशा पुरेशा होतील? मग अशा यज्ञाच्या ज्वालेत कोणत्या समिधा टाकाव्या हे सांगताना ते म्हणाले –

“पहिली समिधा टाका आपल्या भेकडपणाची, एकटे हिंदू स्वराज्य मिळवू शकत नाहीत ही स्वतःवरील अविश्वासाची पहिली समिधा या यज्ञात टाका. ही भिरूता आपण या यज्ञात भस्म केलीच पाहिजे. लोकांकडे रोखून पाहत दुसरी समिधा सांगताना ते म्हणाले, “दुसरी समिधा या यज्ञात टाका ती म्हणजे अस्पृश्य ह्या शब्दातील ‘अ’ या अक्षराची!’’

तिसरी समिधा टाका, ‘ती म्हणजे विधर्मीयांनी जबरदस्तीने वा प्रलोभनाने धर्मांतर केलेल्या हिंदूंना आपण पुनश्च हिंदू करून घेऊ शकत नाही या कल्पनेची! त्या आत्मघातकी कल्पनेची समिधा या यज्ञात टाकून आपण आपले संख्याबळ वाढविलेच पाहिजे!’

आणि चौथी समिधा या यज्ञात टाका ‘ती म्हणजे या पारतंत्र्याची!’ त्याचा म्हणजे पारतंत्र्याचा होम केल्याशिवाय आपला सन्मान, आपले राष्ट्र सामर्थ्यशाली नि संपन्न होणे शक्य नाही. त्यासाठी स्वतःच्या आणि शत्रूच्या शिरकमलांच्या आहुती स्वातंत्र्ययज्ञात अर्पण कराव्या लागतील. त्याची भीती हिंदुराष्ट्राला कधी वाटली नाही, वाटणारही नाही.’’

समोर बसलेल्या विराट जनसमूहाला आवाहन करीत आपले दोन्ही हात उंचावून सावरकरांनी जणू गर्जनाच केली. “हिंदूंनो, आता मोहनिद्रा सोडून या चार समिधा या हिंदू संघटन महायज्ञात टाकून तो प्रज्वलित करा!!’’

एवढे बोलून सावरकरांनी आपले भाषण संपविले. लोकांनी पुनश्च उभे राहून टाळय़ांचा प्रचंड कडकडाट केला! सावरकरांनी सांगितलेल्या समिधा हिंदू समाजाने यज्ञात टाकल्यावर श्रीसंत पाचलेगांवकर महाराजांच्या हिंदू संघटन महायज्ञाची सांगता होणारच होणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची आवश्यकता होती का?

(लेखक श्री मुक्तेश्वर नारायण दत्तानंद ट्रस्ट, दत्तवाडी, नैकोटाचे विश्वस्त आहेत)