मोहेंजोदडो जाणार मातीत?

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

आपल्या प्राचीन सिंधू संस्कृतीचा परिचय करून देणारे मोहेंजोदडो लवकरच पुन्हा दफन होईल, अशी शक्यता आहे. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीच्या हडप्पा संस्कृतीची साक्ष देणारं हे शहर सध्या धोक्यात आहे. या शहराच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न झाल्यामुळे सध्या या शहरावर संशोधन करणाऱ्या इतिहास संशोधकांनी हे शहर पुन्हा दफन करण्याचे संकेत दिले आहेत.

मोहेंजोदडोवर संशोधन करणारे हॉर्वर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक आणि इतिहास संशोधक रिचर्ड मिडो यांनी याबाबत माध्यमांना सविस्तर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांमध्ये मोहेंजोदडोला धोका निर्माण झाला आहे. मुळात, सिंध हा प्रांत उष्ण आहे. त्यामुळे तापमान आणि आर्द्रतेचा परिणाम या पुरातन अवशेषांवर व्हायला लागला आहे. याशिवाय जमिनीत असलेल्या जलपातळीत मिठाचं प्रमाण आढळतं. त्या मिठामुळेही या अवशेषांचं नुकसान होतंय. त्यामुळे या अवशेषांचं जतन करणं कठीण होऊन बसलं आहे.

जोपर्यंत अवशेषांना जतन करण्याचा एखादा चांगला मार्ग आम्हाला सापडत नाही, तोपर्यंत मोहेंजोदडोला जमिनीत दफन करूनच त्याचं संरक्षण केलं जाऊ शकतं. याखेरीज मोहेंजोदडोवर तालिबानी आणि इसिसच्या हल्ल्यांच्या धोक्याचं वादळ घोंघावत आहे, त्यामुळे या शहराला वाचवणं जास्त महत्त्वाचं ठरत आहे, असंही मिडो यांचं म्हणणं आहे.

काय आहे मोहेंजोदडो?

सिंध प्रांतात जमिनीच्या पोटात लपून बसलेल्या मोहेंजोदडो या शहराचा शोध १९२२ साली तत्कालीन हिंदुस्थानच्या पुरातत्त्व खात्याचे अधिकारी राखालदास बॅनर्जी यांनी लावला होता. मोहेंजोदडो या शब्दाचा सिंधी भाषेतला अर्थ आहे मृतांचा डोंगर. हजारो वर्षांपूर्वी आजच्या स्मार्ट सिटींनाही लाजवेल असं उत्तम नियोजन असलेल्या या शहरात तत्कालीन हडप्पा नामक संस्कृती अस्तित्वात होती. मोहेंजोदडो इथे एकाखाली एक अशा सात शहरं असल्याचा शोधही लागला होता. हिंदुस्थान आणि पाकिस्तान फाळणीनंतर हे शहर पाकिस्तानात गेलं.