कोंबडीच्या पिलाला माकडाने घेतले दत्तक

सामना ऑनलाईन, तेल अवीव

सध्या इस्रायलच्या रन गन जंगल सफारी पार्कमध्ये एक आगळेवेगळे दृश्य दिसतंय. ते बघण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करीत आहेत. एका माकडाने कोंबडीचे पिल्लू दत्तक घेतलं आहे. पोटच्या मुलाप्रमाणे माकड त्या कोंबडीच्या पिलाला सांभाळत आहे. जिथे जाईल तिथे मकाऊ माकड पिलाला सोबत घेऊन जात आहे. त्याला जराही एकटे सोडत नाही. दोन वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांची ही अजीब दोस्ती फक्त इस्रायलमध्ये नव्हे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात चर्चेला आली आहे. एकत्र खाणे, पिणे, एकत्र झोपणे, मस्ती करणे…दोघांमध्ये खूप जिव्हाळा दिसून येत आहे. पिलाच्या संगोपनात कोणतीही कमी राहू नये, याची पुरेपूर काळजी माकड घेत आहे. अगदी पिलाचे अंग साफ करण्याचे कामदेखील माकड करतंय. रन गन जंगल सफारीत प्राण्यांची ही दोस्ती बच्चेकंपनीचे मोठे आकर्षण बनली आहे.