मोनोचा जेकब सर्कल ते चेंबूर व्हाया वडाळा प्रवास मार्चअखेरपासून

सामना ऑनलाईन, मुंबई

जेकब सर्कल ते चेंबूर व्हाया वडाळा अशा चाचणीसाठी रोज धावताना दिसणाऱया मोनो रेल्वेतून प्रत्यक्ष प्रवासाची संधी मुंबईकरांना चालू महिनाअखेरपर्यंत मिळणार आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त येत्या आठवडय़ात या मार्गावरील स्थानकांची पाहणी करणार आहेत. त्यांनी हिरवा कंदील दिल्यानंतर मोनो रेल्वे या मार्गावरून प्रवाशांना घेऊन धावण्यास सुरुवात होईल.

मोनो रेल्वेच्या या दुसऱया टप्प्याचे बांधकाम कधीच पूर्ण झाले आहे. गेली सहा महिने मोनोची चाचणी रोजच्या रोज घेतली जात आहे. दरम्यान तीन आठवडय़ांपूर्वी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या मार्गाची पाहणी केली होती. आता पुन्हा एकदा अंतिम पाहणी केल्यानंतर मोनोला हिरवा झेंडा दाखवला जाईल.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली. फेब्रुवारीच्या तिसऱया आठवडय़ात रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी पाहणी केल्यानंतर त्यांना काम पूर्ण झाल्याबाबतची सर्व माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली. मार्चच्या तिसऱया आठवडय़ात सुरक्षा आयुक्तांकडून पुन्हा पाहणी झाल्यानंतर अंतिम सुरक्षा प्रमाणपत्र मिळेल आणि मोनोचा पुढचा प्रवास सुरू होईल अशी माहिती या अधिकाऱयाने दिली.

मध्य मुंबईत प्रवशांच्या उदंड प्रतिसादाची अपेक्षा

जेकब सर्कल ते वडाळा हा मोनो रेल्वेचा मार्ग मध्य मुंबईतून जातो. तिथे दाट लोकवस्ती आहे. वडाळा, परेल, लालबाग, करीरोड, डिलाईल रोड, जेकब सर्कल या मार्गावरील मोनो रेल्वेला प्रवाशांना चांगला प्रतिसाद लाभेल. मागे झालेले नुकसानही हा टप्पा सुरू झाल्यानंतर भरून निघेल अशी एमएमआरडीएला अपेक्षा आहे. मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठीची मुदत एमएमआरडीएला बारा वेळा पाळता आलेली नाही. डिसेंबर २०१७ ही शेवटची मुदत होती.

जेकब सर्कल ते चेंबूर व्हाया वडाळा असा टप्पा एकाच वेळी सुरू करण्याचा एमएमआरडीएचा विचार आहे. गेल्या ९ सप्टेंबर रोजी म्हैसूर कॉलनी स्थानकात मोनो रेल्वेच्या डब्यांना आग लागल्याची घटना घडल्याने वडाळा ते चेंबूर हा पहिला टप्पा कार्यरत केला गेला नव्हता. वडाळा-चेंबूर हा टप्पा बंद राहिल्याने एमएमआरडीएचा दर दिवशी सुमारे पाच लाखांचा महसूल बुडत आहे. आतापर्यंत सुमारे चार कोटी रुपयांपर्यंत महसूल बुडाला आहे.

अंधेरी ते दहिसर मेट्रोसाठी निविदा मागवल्या

एमएमआरडीएने अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) या मेट्रो-७ मार्गासाठी संरचना, बांधकाम, उत्पादन, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि मार्ग खुला करून रुळ बांधण्याकरिता इच्छुक कंत्राटदारांकडून निविदा मागवल्या आहेत. पात्र कंत्राटदार एमएमआरडीएच्या संकेतस्थळावरून २४ एप्रिल २०१८ पर्यंत ई-निविदा प्रस्ताव डाऊनलोड करू शकतात. निविदा सादर करण्यासाठी २५ एप्रिल ही अंतिम मुदत आहे. अधिक माहितीसाठी [email protected] या ई-मेलवर किंवा ०२२-२६५९७४४५ या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.