मोनोचा फेरा, प्रवाशांना गुंगारा


सामना ऑनलाईन । मुंबई

देशातील पहिल्या मोनो रेलचा चेंबूर, वडाळा ते सातरस्ता असा संपूर्ण टप्पा फेब्रुवारीपासून सुरू झाला. परंतु दुसऱ्या टप्प्याची स्थानके प्रवाशांना गोंधळात टाकत आहेत. वडाळा ते सातरस्ता हा टप्पा सुरू झाल्यानंतरही बिघाडाचे सत्र सुरूच असल्याने प्रवाशांची संख्या पुन्हा रोडावत चालली आहे. त्यातच दर 22 मिनिटांना असणारी मोनो रेलची फेरी आता दर 40 मिनिटांवर गेली आहे. मोनो रेलच्या स्थानकांची नावेही सारखीच असल्याने प्रवाशांना ती चांगलाच गुंगारा देत आहेत.

मोनो रेलचा पहिला टप्पा चेंबूर ते वडाळा तोटय़ात असताना आता दुसरा टप्पाही 3 मार्चपासून सुरू करण्यात आला आहे. या दुसऱ्या टप्प्यात वडाळा ते सातरस्ता (जेकब सर्कल) असा संपूर्ण दाट वस्तीतून जाणारा मार्ग असल्याने मोनो रेलची प्रवासी संख्या वाढण्याची दाट शक्यता असतानाच मोनो रेलमध्ये 10 एप्रिलच्या सकाळी अचानक बिघाडाचे संकट ओढवले. गाडय़ा सारख्याच बिघडत असल्याने फेऱ्यांवर त्याचा परिणाम होत आहे.

वडाळा डेपो की वडाळा रोड?
वडाळ्याची हद्द नेमकी कुठून कुठपर्यंत आहे हे मुंबईत नवीन आलेल्यांना कळणे कठीण आहे. वडाळा येथे प्रसिद्ध राममंदिर आहे. तेथेही मोनो रेलचे स्टेशन आहे. मग वडाळा डेपो हे स्टेशन प्रवाशांना गोंधळात टाकत आहे. मुंबईत नवखे असलेले प्रवासी वडाळा रेल्वे स्टेशन समजून वडाळा डेपोला उतरत आहेत.

आता 40 मिनिटांनंतर फेरी
नेहमी घाईगडबडीत असणाऱ्या मुंबईकरांना आता एक मिनीटही महत्त्वाचे असताना 40 मिनिटे कोण थांबणार? त्यामुळे केईएम, टाटा हॉस्पिटलला जाणारे रुग्ण तिचा वापर करीत आहेत. रोज पंधरा हजार प्रवाशांना वाहून नेणारी मोनो रेल पुन्हा खूप अंतराने सेवा असल्याने याही प्रवाशांना गमावण्याची भीती व्यक्त होत आहे.

वेळापत्रकच अनिश्चित
एम-इंडिकेटर्सवरदेखील मोनो रेलच्या दुसऱ्या टप्पाचे वेळापत्रक व स्थानके दिसत नसल्याने याबाबत ऍपचे संचालक सचिन टेके यांना विचारले असता त्यांनी आम्ही एमएमआरडीएशी याबाबत पत्रव्यवहार केला आहे, परंतु त्यांच्याकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला नसल्याचे टेके यांनी सांगितले, तर मोनो रेलनेदेखील स्वतःच्याच गाडय़ांमध्ये दुसऱ्या टप्प्याची स्थानके दर्शविली नसल्याने सर्वच गोंधळाचे वातावरण आहे.