आगीची चौकशी संपल्यानंतरच मोनो डार्लिंग धावणार

सामना प्रतिनिधी । मुंबई

चेंबूरच्या माहुल येथील म्हैसूर कॉलनी स्थानकात गुरुवारी पहाटे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या मोनोरेलच्या दोन कोचमुळे मोनोरेलच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालानंतरच मोनोरेल पुन्हा चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आर्थिक अडचणीत असलेल्या मोनोरेलच्या शेवटच्या दोन कोचना काल पहाटेच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागून ट्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने ही गाडी संपूर्ण रिकामीच होती, मोनोरेलचे ड्रायव्हर कसेबसे बाहेर आल्याने बचावले. त्यानंतर पुढील सूचना मिळेपर्यंत मोनोरेल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गुरुवारीच एमएमआरडीएने निवृत्त रेल्वे सुरक्षा आयुक्त पी. एस. बगेल यांच्या नेतृत्वाखाली मोनोरेलच्या आगीची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. त्या समितीचा अहवाल आल्यानंतरच मोनोरेलच्या फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात येतील. तपासणीनंतर मोनोच्या डब्यांमध्ये नेमका काय दोष आहे याचा उलगडा त्यामुळे करणे शक्य होणार आहे. त्यामुळे चेंबूर परिसरात ट्रफिक जॅमपासून सुटका मिळविण्यासाठी सकाळी व संध्याकाळी पिकअवरमध्ये मोनोचा वापर करणाऱ्या प्रवाशांना आता अन्य प्रवास साधनांचा वापर करावा लागणार आहे.

दिवसाला दीड लाखाचे उत्पन्न
मोनोरेलच्या चेंबूर ते वडाळा या पहिल्या टप्प्यात दररोज अडीचशेहून अधिक फेऱ्या होत असून १५ ते १७ हजार प्रवासी दररोज प्रवास करतात. त्यातून दिवसाला दीड लाखाचे उत्पन्न एमएमआरडीएला मिळत होते. मोनो चालविण्याचा खर्च पाहता हे उत्पन्न अत्यंत तुटपुंजे असून दिवसाला सहा ते आठ लाखांचा मोनोला तोटा होत आहे.

सरकारचे चौकशीचे आदेश
मोनोरेलच्या रिकाम्या कोचना लागलेल्या आगीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज जाहीर केले. नगर विकास खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर आगीच्या कारणांची चौकशी करून सात दिवसांत आपला अहवाल सादर करतील असेही त्यांनी स्पष्ट केले.