दहा महिन्यांनी मोनो डार्लिंग धावली!

सामना ऑनलाईन । मुंबई

गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेली मोनो रेल्वे सेवा शनिवारपासून पुन्हा सुरू झाली. देशातील पहिली मोनो रेल्वे फेब्रुवारी 2014 रोजी मुंबईतील चेंबूर ते वडाळा मार्गावर धावली. नोव्हेंबर 2017 मध्ये म्हैसूर कॉलनी स्थानकात मोनोला आग लागली होती. या आगीत मोनोचे 25 कोटींचे नुकसान झाले होते. तेव्हापासून मोनो बंद होती. शनिवारी सकाळी 6 वाजता पहिली मोनो रेल वडाळा आणि चेंबूर या दोन्ही स्थानकांवरून सुटली. मोनो रेल्वेचा हा टप्पा सुरू करताना प्रवासी भाड्यामध्ये वाढ करण्याचा ‘एमएमआरडीए’ प्रशासनाचा विचार होता. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा, असे एकसदस्यीय समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. त्यानुसार प्रवासी भाड्यात वाढ न करण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ प्रशासनाने घेतला आहे.