पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले

सामना ऑनलाईन । नागपूर

तब्बल ४७ वर्षांनंतर नागपूर येथे झालेल्या पावसाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सायंकाळी सूप वाजले. या अधिवेशनात विधानसभेत २३ तर विधान परिषदेत २२ विधेयके मंजूर करण्यात आली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव, शनिशिंगणापूर येथील मंदिर ताब्यात घेणे, दिवाणी प्रकिया संहिता सुधारणा विधेयक, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ सुधारणा विधेयक, महापालिका सुधारणा विधेयक यासह इतर विधेयके दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आली.

मुंबईत होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सरकारच्या आग्रहाखातर नागपूर येथे घेण्यात आले यावर सुरुवातीपासूनच टीका होत होती. त्यात परत मुसळधार पावसामुळे विधिमंडळात पाणी घुसून चक्क कामकाज बंद पडण्याची नामुष्की भाजप सरकारवर ओढवली. १३ दिवस चाललेल्या अधिवेशनात विधानसभेत ८६ तास १९ मिनिटे कामकाज झाले. दोन्ही सभागृहांनी मिळून १५ विधेयके मंजूर केली. विधान परिषदेत ७४ तास १२ मिनिटे कामकाज झाले. विधान परिषदेत २२ विधेयके मान्य झाली.

हौस भागली, हिवाळी अधिवेशन मुंबईत

पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची सरकारची हौस भागल्यानंतर आता पुन्हा येथे हिवाळी अधिवेशन घेण्यास सरकारने कानाला खडा लावला आहे. हिवाळी अधिवेशन म्हणजे नागपूर ही ओळख आता खोडली जाणार असून १९ नोव्हेंबरपासून मुंबई येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे.