पावसाळी आजारांचा धोका कायम, स्वाइन फ्लू दुप्पट वाढला; आठवडाभरात 80 रुग्ण

मुंबईत पावसाळी आजारांचा धोका कायम असून स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये सलग दुसऱ्या आठवडय़ात मोठी वाढ झाली आहे. आठवडाभरात स्वाइन फ्लूचे तब्बल 80 रुग्ण आढळले आहेत. शिवाय मलेरिया आणि गॅस्ट्रो रुग्णांमध्येही मोठी वाढ होत असून मलेरियाचे 218 तर गॅस्ट्रोचे 119 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असतानाही पावसाळी आजार वाढत असल्याने टेन्शन वाढले आहे. यामध्ये दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफाइड, कॉलरा, जाँडीस असे आजार होतात, तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया असे आजार पसरत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. गेल्या आठवडय़ात मलेरियाचे 154, डेंग्यूचे 17, लेप्टो 23, स्वाइन फ्लूचे 51 आणि गॅस्ट्रोचे तब्बल 184 रुग्ण आढळले होते. यामध्ये रुग्णांची वाढ कायम असल्याचे पालिकेने जाहीर केलेल्या पावसाळी आजारांच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, वाढणारे पावसाळी आजार रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करण्यात येत असून दीड हजार बेड तैनात ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. पावसाळी आजार रोखण्यासाठी घरोघरी तपासणी आणि औषध-गोळय़ांचे वाटपही करण्यात येत आहे.

रुग्णांची आकडेवारी

  • मलेरिया ….   218
  • लेप्टो …………  13
  • डेंग्यू ………….  27
  • गॅस्ट्रो ……….  119
  • हिपेटायटीस ..  16
  • चिकुनगुनिया …  1
  • एच1एन1 ……  80

अशी घ्या काळजी

  • स्वाइन फ्लू आजारात ताप, कफ, घशात इन्फेक्शन, शरीर जखडणे, डोकेदुखी, अतिसार, उलटी अशी लक्षणे आहेत. त्यामुळे अशी लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.
  • शिंकताना, खोकताना नाकावर रुमाल पकडावा. वेळोवेळी हात साबण पाण्याने स्वच्छ धुवावेत. डोळे-कान-तोंडाला वारंवार स्पर्श करू नये. गर्दी टाळावी.
  • नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा. पाणी साचू देऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.