नाशिक जिह्यात मान्सूनची हजेरी

78

सामना ऑनलाईन ,मनमाड

येवला, मनमाडमध्ये गारांचा पाऊस

नाशिक जिह्यातील मनमाड शहर व परिसरात मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला मान्सूनने सलामी दिली. तर येवला शहर, राजापूर, ममदापूर, नगरसूल येथे गारांचा पाऊस झाला. अंदरसूल येथेही जोरदार पाऊस झाला. वादळामुळे झाडे उन्मळून पडली. उघडय़ावर असलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले. विंचूर, लासलगाव येथे जोरदार वादळी पाऊस झाला. खळ्यावर व शेतात पाणी शिरल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले.

तुफानी वादळी वाऱयासह पडलेल्या गारांच्या पावसामुळे विजेचे खांब वाकले. झाडे उन्मळून पडली. घरांचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले. रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने लांब पल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूक तब्बल दीड तास खोळंबल्याने प्रवाशांचे हाल झाले. तर विंचूर, लासलगाव येथे वादळी पाऊस झाला, तर येवला शहर परिसरात गारांचा पाऊस झाला. कांदा पिकाचे यामुळे मोठे नुकसान झाले.

मनमाड शहराच्या विविध भागांत झाडे उन्मळून पडली, झाडांच्या फांद्या तुटून घरांवर पडल्याने नुकसान झाले. रेल्वे स्थानकात फलाट क्र 1 जवळ ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याने वाहतूक दीड तास ठप्प झाली. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. दरम्यान, वादळी वारे आणि गारांचा पहिलाच पाऊस शहरासाठी नुकसानकारक ठरला. सकाळपासूनच शहरात 41 अंशावर तापमान गेल्याने कमालीचा उकाडा जाणवत होता. दुपारी पावणेचारच्या सुमारास वादळी वाऱयासह गारांचा पाऊस सुरू झाला. वाऱयाचा वेग इतका प्रचंड होता की, यामुळे विजेचे खांब वाकले. वीजपुरवठा खंडित झाला. सखल भागात पाण्याचे तळे साचले. गारा पडल्याने शेतपिकांसह खळय़ावरील कांद्याचे मोठे नुकसान झाले. मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला पावसाने जोरदार सलामी दिल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला.

इदगा विभागातील मनोरम सदन शाळेच्या वर्ग क्रमांक 4 वरील पत्रे वादळाने उडाले. विजेच्या वायर्स तुटल्या. काही घरांच्या भिंतीही पडल्या, शहराच्या अनेक भागांत झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने वाहतूक खोळंबली. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र बऱयाच भागांत बंद पडलेल्या कूपनलिकांना पाणी आले  आहे.

एक्सप्रेस खोळंबल्या

ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याने भुसावळ-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली. पवन, कामायनी, कर्नाटक एक्सप्रेस, म्हैसूर एक्सप्रेस, सचखंड, साकेत एक्सप्रेस या सर्वच प्रवासी गाडय़ा विविध स्थानकांवर खोळंबल्या. दुपारी पावणेचारच्या सुमारास झाड ओव्हरहेड वायरवर पडले. त्यामुळे मोठा जाळ झाल्याने प्रवाशांची पळापळ झाली.

लासलगाव, विंचूरमध्ये वादळी वाऱयासह बरसला

झाडे उन्मळली, विजेचे खांब वाकले

ओव्हरहेड वायर तुटल्याने प्रवाशांचे हाल

येवल्यात कांदा चाळींचे नुकसान

येवला – या वर्षीच्या पहिल्याच पावसाने येवला शहरासह तालुक्यात शेतकरी व व्यापाऱयांची त्रेधातिरपिट उडविली. जोरदार वादळासह गारांच्या पावसाने शहरातील दोन कांदा व्यापाऱयांचे शेड उडून वीस लाखांवर नुकसान झाले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तर काही ठिकाणी घरांचे पत्रे व भिंतीही पडल्या. शहरासह तालुक्यात सायंकाळी तीन तासांवर वीजपुरवठा खंडित झाला होता.

दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राजापूर ममदापूर परिसरात जोरदार वादळी वाऱयासह गारांचा पाऊस झाला. त्यानंतर येवला शहर व परिसरात ही सुमारे दहा मिनिटे जोरदार वादळ सुरू होते. यानंतर गारांसह पावसाचे आगमन झाले सुमारे वीस ते पंचवीस मिनिटं हा पाऊस सुरू होता. मात्र सुरुवातीला जोरदार वारे असल्याने येथील कांदा व्यापारी उमेश अटल यांचे मनमाड रोडवरील कांद्याचे शेड उन्मळून पडले. या शेडमध्ये ठेवलेल्या कांद्यापैकी सुमारे दोन हजार क्विंटल कांदे भिजले असून कांदा चाळ ही पडल्याने त्यांचे दहा लाखापर्यंत नुकसान झाले आहे तसेच संकेत पटणी यांचेही 400 क्विंटल कांदे भिजले असून कांदा चाळ ही पडल्याने पाच लाखांच्या आसपास नुकसान झाले आहे.

शहरातील येवला कोपरगाव महामार्गावर भररस्त्यात झाड उन्मळून पडल्याने येथे दोन ते तीन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. पाटोदा रोडवर कृषी कार्यालयासमोरही झाड उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. आडगाव चोथवा येथे वाल्मिक किसन खोकले यांच्या घराचे पत्रे उडाल्याने भिंतीही पडल्या.

ममदापूर, देवदरी, खरवंडी व रेंडाळे येथे वाऱयाचा वेग जास्त असल्याने रेंडाळे येथे सात ते आठ घरांचे पत्रे उडाले. कचरू राऊत यांच्यावल घराचे पत्रे कोसळल्याने ते जखमी झाले.

राजापूरला दुपारी तीन वाजेच्या दरम्यान अचानक विजांचा कडकडाट व गाराचा पाऊस सुरू झाला. यामुळे शेतकऱयांची एकच तारांबळ उडाली.

आठवडे बाजार विस्कळीत

नगरसूल परिसरात सोसाटय़ाच्या वाऱयासह पाऊस पडला. काही ठिकाणी गाराही पडल्या. नगरसूल येथील आठवडे बाजार असल्याने या पावसाने व्यावसायिकांची आणि ग्राहकांची धावपळ झाली.

मुखेड परिसरात प्रारंभाला पावसाचे काही एक लक्षण नव्हते. मात्र दुपारी 4. 30 वाजता वादळी वाऱयासह पाऊण तास पावसाने झोडपले.

आपली प्रतिक्रिया द्या