मान्सून महाराष्ट्रातून परतला, देशालाही २४ तासांत अलविदा करणार

सामना ऑनलाईन । पुणे

नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) मंगळवारी संपुर्ण महाराष्ट्रातून परतल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. १० जून रोजी दक्षिण कोकणात दाखल झाल्यानंतर सुमारे चार महिने १४ दिवस मान्सूनने राज्यात मुक्काम केला. येत्या २४ तासांमध्ये मान्सून संपूर्ण देशाला अलविदा करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मान्सूनने मंगळवारी ईशान्य हिंदुस्थान, महाराष्ट्रातून पूर्णपणे माघार घेतली. तर बंगालच्या उपसागर, आंध्रप्रदेशचा किनारपट्टीय भाग, तेलंगणा, कर्नाटक आणि अरबी समुद्राच्या काही भागातून वारे परतले आहे. संपुर्ण देशातून मान्सून परतण्यास पोषक स्थिती असून, २६ तारखेपासून दक्षिण हिंदुस्थानात ईशान्य मोसमी वारे सक्रीय होईल, असेही हवामान खात्याने जाहीर केले आहे.
यंदा नियमित वेळेच्या आधी दोन दिवस ३० जून रोजी केरळात दाखल झाल्यानंतर १० जून रोजी दक्षिण महाराष्ट्रापर्यंतचा पल्ला गाठल्यानंतर २४ जून रोजी मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापले. १९ जुलै रोजी मान्सूनने देशात सर्वदूर हजेरी लावली. त्यानंतर २७ सप्टेंबर रोजी राजस्थानातून तळ उठवून देशातून परतीचा प्रवास सुरू केला. १५ ऑक्टोबर रोजी राज्याच्या उत्तर भागातून तर २० ऑक्टोबर रोजी संपुर्ण विदर्भासह राज्याच्या बहुतांशी भागातून मान्सून परतला होता.

मान्सूनच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीमध्ये देशभरात ८४१.३ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडला. तर राज्यात सरासरी १००६.५ मिलीमीटर (१०० टक्के) पाऊस पडला होता. त्यानंतरही परतीच्या काळातही मान्सून सक्रीय असल्याने ऑक्टोबर महिन्यात राज्यात सर्वदूर वादळी पाऊस पडला. महिन्यातील पावसाच्या सरासरीपेक्षा राज्यात ४७ टक्के अधिक पाऊस पडला असून, २३ तारखेपर्यंत सरासरी ९६.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

मान्सून हंगामातील विभागनिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये (कंसात सरासरी पाऊस)
विभाग                 जून ते सप्टेंबर               ऑक्टोबर
कोकण              ३२०६ (२९१४.७)     १५२.७ (१०८.९)
मध्य महाराष्ट्र        ८५२.५ (७२९.३)      ११२.४ (६८.७)
मराठवाडा          ६४२.४ (६८२.९)       १००.२ (६२.७)
विदर्भ               ७३१.५ (६४२.४)        ५७.५ (५१.०)