रंपाट चोरांना अटक, गुगलच्या मदतीने पोलिसांनी आरोपींना पकडले

235

सामना ऑनलाईन, मुंबई

डेबिट कार्डाची माहिती अवघ्या 15 डॉलरला म्हणजे जवळपास 1064 रूपयांना विकत घेऊन त्याद्वारे व्यवहार करणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी अहमदाबाद इथले असून अशक्य वाटणारा हा तपास मुंबई पोलिसांनी यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. हितेशकुमार पटेल (21 वर्ष) आणि नथूभाई ठाकोर(39 वर्ष) अशी या दोन आरोपींची नावे आहेत. या दोघांनी मुंबईतील एका महिला वकिलाच्या बँक खात्यातून जवळपास 16 हजार रूपये चोरले होते.

मुलुंड इथे राहणाऱ्या अॅडव्होकेट मीनाक्षी (बदललेले नाव) यांनी 28 जानेवारी 2019 रोजी मुलुंड स्टेशन परिसरात असलेल्या अतिथी हॉटेलजवळच्या HDFC बँकेच्या एटीएममधून संध्याकाळी 3 वाजण्याच्या सुमारास 5000 रूपये काढले होते.  त्यानंतर साधारणपणे पाच वाजेच्या सुमारास त्यांना मोबाईलवर खात्यातून एकामागोमाग एक रक्कम काढल्याचे मेसेज यायला लागले. मीनाक्षी यांनी ताबडतोब त्यांचे कार्ड ब्लॉक केले,मात्र तोपर्यंत त्यांच्या खात्यातून जवळपास 16 हजार रूपये काढण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी मुलुंड पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

दोन दिवसांपूर्वी अॅडव्होकेट मीनाक्षी यांना मुंबई पोलिसांकडून आरोपी पकडल्याचा मोबाईलवर मेसेज आला होता. त्यांनी मुलुंड पोलिसांशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला. Moonfrogs lab, Octro Inc या ऑनलाईन जुगाराच्या वेबसाईटवर जाऊन हितेशकुमार पटेल आणि नथूभाई ठाकोर या दोघांनी छोट्या छोट्या रकमांचे जुगार खेळले होते. धक्कादायक बाब ही आहे की त्यांनी यासाठी मीनाक्षी यांच्या क्रेडीट कार्डाची माहिती वापरली होती. ही माहिती वेबसाईटवर सहजपणे उपलब्ध असते आणि ती स्वस्तात विकत घेता येते असं पोलिसांना कळालं आहे. माहिती विकत घेणाऱ्याला कार्ड कोणाचं आहे हे मात्र कळू शकत नाही.

कसा करतात घोटाळा

क्रेडीट किंवा डेबिट कार्डाची माहिती चोरण्यासाठी एटीएममशिनमध्ये स्कीमर मशिन लावले जाते. या मशिनमुळे एटीएम सेंटरमध्ये कार्ड वापरणाऱ्या ग्राहकाचा सगळा तपशील कार्डधारकांचा तपशील विकणाऱ्या गुन्हेगारांच्या हाती लागतो.हे गुन्हेगार वेबसाईटद्वारे ज्यावर क्रेडीट किंवा डेबिट कार्डधारकाचा सगळा तपशील विकतात. यामध्ये अकाऊंट नंबर, कार्डधारकाचे नाव, कार्ड संपण्याचा महिना/वर्ष आणि CVV नंबरचा समावेश असतो. सीव्हीव्ही नंबर मिळाल्याने ओटीपीशिवाय हे गुन्हेगार सहजपणे व्यवहार करू शकतात. ऑनलाईन जुगार खेळणारे आरोपी कमी रकमेचे व्यवहार करतात त्यामुळे फसवणूक झालेले ग्राहक पोलिसांत जाणं टाळतात. असे गुन्हे उघडकीस आणायचे असतील आणि आरोपींना गजाआड करायचे असेल तर कार्डधारकांनी पुढे येऊन पोलिसांत तक्रारी दाखल करणे गरजेचे आहे.

पैसे कोणी काढले याचा पोलिसांना अजिबात सुगावा लागत नव्हता. वर नमूद केलेल्या ऑनलाईन जुगारांच्या वेबसाईटवर गुगल किंवा फेसबुकचा आयडी वापरणं बंधनकारक आहे. अटक केलेल्या आरोपींनी त्यांचे गुगल आयडी दिले होते. मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी गुगलशी संपर्क साधला. आयडी तयार करण्यासाठी या आरोपींनी त्यांचे मोबाईल नंबर  दिले होते. गुगलने हे नंबर पोलिसांना दिले, ज्यावरून त्यांनी आरोपींची नावे आणि त्यांचे मोबाईल लोकेशन शोधून काढले. या माहितीच्या आधारे मुलुंड पोलिसांनी अहमदाबादमधील महादेव नगर भागातून हितेशकुमार आणि नथूभाई ठाकोर यांना अटक केली. या दोघांची रवानगी न्यायालयाने 27 मे पर्यंत पोलीस कोठडीत केली आहे. या प्रकरणाचा तपास मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश वारके आणि पोलीस उपनिरीक्षक संभाजी वडते यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला.

आपली प्रतिक्रिया द्या