मॉडर्न लोकनाट्य – ‘सुरक्षित अंतर ठेवा’

क्षितिज झारापकर
[email protected]

लोकनानाट्य हा प्रकार मराठी रंगभूमीवर खूप लोकप्रिय आहे. ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘गाढवाचं लग्न’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘बिनबियांचं झाड’ ही प्रचंड गाजलेली लोकनाट्यं आजही तितकीच रिलिव्हंट वाटतात आणि सादर होतात. मातब्बर नामवंत कलाकारांनी ही लोकनाट्यं वेळोवेळी सादर केली आहेत. दादा कोंडके, राम नगरकर, निळू फुले, मोहन जोशी, विजय कदम ही कलाकारांची मांदियाळी यात आहे. काळाबरोबर लोकनाट्यचा बाज बदलून ती सादर केली गेली. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे लिखित आणि दिग्दर्शित ‘टुरटूर’. या ‘टुरटूर’ने मराठीला अनेक थोर कलाकार दिले. लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम, प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, विजय चव्हाण, चेतन दळवी, सतीश सलागरे ही सगळी मंडळी ‘टुरटूर’मधून नावारूपाला आली. लोकनाट्यात हे सामर्थ्य आहे. हीच गोष्ट रंगकर्मींना सारखी भुरळ घालत असते.

लोकनाट्याचं स्ट्रक्चर तसं सोपं आहे. प्रहसनात्मक सादरीकरणातून सामाजिक किंवा अधिकतर राजकीय परिस्थितीवर भाष्य करत लोकांना मनोरंजनात्मक पध्दतीने काही बोधप्रद संदेश द्यायचा हा लोकनाट्यचा बाज. मग त्यात गण, गौळण, बतावणी, वग अशी विभागणी. काही शाहिरी, काही लावणी थाटाची गीतं आणि भरपूर मनोरंजन हा लोकनाट्यचा मूळ थाट. वेष्टन बदलून पुस्तक नव्याने बाजारात आणावं तसं मग संतोष पवारसारख्या नव्या दमाच्या रंगकर्मींनी लोकनाट्य या प्रकाराचं वेष्टन बदलून ते नाटक म्हणूनदेखील सादर करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न खूप यशस्वी झाला. आजही प्रणीत कुलकर्णी या लेखक दिग्दर्शकाने पुन्हा असा प्रयत्न केलाय. या प्रयत्नाचं नाव आहे ‘सुरक्षित अंतर ठेवा’.

प्रणीत कुलकर्णी यांनी ‘सुरक्षित अंतर ठेवा’ लिहिताना ते अक्षरशः लोकनाट्यसारखं लिहिलंय. सूत्रधार आणि सोंगाड्या एकत्र करून अंधार हे पात्र आपल्याला विषयाची आणि पात्रांची ओळख करून देत. सगळी पात्रं आल्यावर या कोर्टरूम कॉमेडीला सुरुवात होते. यात मग छोट्या छोट्या प्रसंगांची प्रहसनं पेरत विषय पुढे सरकतो. विषय आजच्या जीवनात आणि मुळात लग्नात आवश्यक असणारी तडजोड करण्याची वृत्ती. विषय पोहोचवण्याकरिता प्रणीतने का. पो. प. (कांदेपोहे पत्रिका, अरेंज्ड मॅरेजचं एक जोडपं आणि लव्ह मॅरेज झालेलं एक जोडपं अशी प्रातिनिधिक पात्रं मांडली आहेत. या दोन जोडप्यांवर चालवलेल्या खटल्यात ओघाने येणारे मित्र, मैत्रिणी, आई, वडील ही इतर पात्रं आहेतच. रचना चांगली करण्यात प्रणीत कुलकर्णी यांनी यश मिळवलंय. लिखाणात फ्रेशनेसही पुष्कळ जाणवतो. विशेष म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक लॉजिक देण्याचा त्यांचा प्रयत्न खरंच स्तुत्य आहे. ‘सुरक्षित अंतर ठेवा’ हे नाटक लिखाणातच मनोरंजक आणि ताजं आहे. दिग्दर्शन करताना प्रणीतने नाटकाची लय कुठेही रेंगाळणार नाही याची खबरदारी घेतली आहे. ठिकठिकाणी लोकप्रिय हिंदी गीतांच्या चालीवर मराठी गाणी पेरली आहेत. पुण्यातील लग्नसमारंभाची एक नवीकोरी लावणीही आहे. इथे रोहित नागभिडे या संगीत दिग्दर्शकाचं कौतुक करायला हवं. या नाटकाचं संगीत त्याने अत्यंत समर्पक दिलेलं आहे. ‘सुरक्षित अंतर ठेवा’मधली गाणी उपरी वाटत नाहीत. कारणं ती रंगमंचावरून लाइव्ह गाऊन सादर होतात. शुभांगी मुळे आणि गौरव बुरसे हे गायक वेळोवेळी येऊन ती सादर करतात. त्यामुळे ती नाटकाचाच भाग वाटतात.

‘सुरक्षित अंतर ठेवा’च्या वरील संक्षिप्त आलेखावरून याची पठडी लोकनाट्याची आहे असं मी का म्हटलं हे लक्षात आलं असेलच. लोकनाट्याला कलाकारांच्या अभिनय कसबाची आतषबाजी खूप गरजेची असते. इथे पुन्हा दिग्दर्शकाने निवड चोख करून बाजी मारलीय. सूत्रधार–सोंगाड्याच्या भूमिकेत पुष्कर श्रोत्री याने कमाल केली आहे. एकतर पुष्कर एक उत्तम नट. त्यात अतिशय तल्लख विनोदबुध्दी. त्यामुळे पुष्करने सूत्रधार म्हणून मध्ये बहार आणलीय. सचिन देशपांडे आणि तन्वी पालव ही का. पो. प. अरेंज्ड मॅरज जोडी म्हणून फारच शोभून दिसते. तन्वीने वापरलेली पाय आपटून थयथयाट करून लक्ष वेधून घेण्याची लकब बऱ्याच प्रेक्षकांना आयडेन्टाय होते आणि दाद मिळवते. सचिनने अरेंज्ड नवऱ्याचा हताशपणा टेरिफिक दाखवलाय. निखिल राऊत आणि माधवी निमकर यांचे लव्ह मॅरेजमधले लव्ह बर्ड्स मस्त जमलेत. निखिलने एक आतल्या गाठीचा प्रांजळपणा फारच छान पेश केलाय. माधवीने कमरपट्ट्याची साखळी गरागरा फिरवत केलेला विचार प्रेक्षकांना भावून जातो. या सगळ्यात सीमा घोगळे अणि संदीप जंगम यांनी रंगवलेली आगंतुक पात्र एखाद्या चांगल्या पदार्थाला फक्कड फोडणी द्यावी तशी चव वाढवून जातात. विशेषतः सीमाने सगळ्यांबरोबर सादर केलेली पुणेरी लग्न समारंभाची लावणी सुरेख.

‘सुरक्षित अंतर ठेवा’ हे नाटक पाहताना प्रश्न पडतो तो एकच. साध्या विषयावरच्या उत्तम सादरीकरण असलेल्या या लोकनाटय़ाला इतका अवास्तव सेट असण्याची गरज आहे का? जे नेपथ्य आहे ते कथानकाला समर्पक आहे यात शंका नाही. पण ते ज्या पध्दतीचं भडक आणि बोजड आहे तेवढं आवश्यक आहे का? नेपथ्यात क्रिएटिव्हिटी खूप आहे. नाटक पाहताना त्यामुळे ते नयनमनोहरदेखील वाटतं, पण कुठेतरी परफॉर्मन्स एरिया खूप कमी आल्यासारखंही वाटत राहतं.

हे एक तुफान मनोरंजन असलेलं ताजंतवानं नाटक आहे, ज्यात प्रहसनात्मक विनोद ठासून भरलेला आहे आणि त्याचबरोबर गीत-संगीताने नटलेला हा एक मॉडर्न अवतारातला तमाशा आहे.

‘सुरक्षित अंतर ठेवा’ हा आजच्या आधुनिक युगातील विनोद ठासून भरलेला मॉडर्न तमाशा आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये.

l नाटक: सुरक्षित अंतर ठेवा

l निर्मिती: जय मल्हार, अष्टविनायक

l निर्माते: शुभांगी मुळे, नितीन मुळे

l नेपथ्य: सुमीत पाटील  l संगीत: रोहित नागभिडे

l लेखक/ दिग्दर्शक/ गीतकार :  प्रणीत कुलकर्णी

l कलाकार : माधवी निमकर, तन्वी पालव, सचिन देशपांडे, निखिल राऊत, राजू बावडेकर, सीमा घोगळे, शुभांगी मुळे, गौरव बुरसे, पुष्कर श्रोत्री.

l दर्जा : ***