ख्रिसमसपूर्वीच सरकारने दिलं मनस्तापाचं गिफ्ट

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

मंगळवारपासून देशातील जनतेने आणखी जास्त मनस्तापासोबत संघर्ष सुरू केलाय.रोज नव्या नियमांमुळे गोंधळून गेलेल्या देशभरातील अनेक बँकांनी कष्टकरी जनेतेची ५ हजारपेक्षा जास्त रक्कम न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता करायचं तरी काय असा प्रश्न हिंदुस्थानातील सामान्य जनतेसमोर निर्माण झालाय.

सरकारच्या नव्या नियमानंतर एका मोठ्या बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की जर चौकशीसाठी २ अधिकारी उपलब्ध असतील तरच ५ हजारपेक्षा जास्त रक्कम स्वीकारली जाईल. मात्र ग्रामीण भाग आणि निमशहरी भागातील बँकेत एकच अधिकारी असतो आणि तो म्हणजे मॅनेजर बाकी सगळा कारकूनवर्ग असतो, अशा परिस्थितीत दोन अधिकारी कुठून येणार असा प्रश्न विचारला जातोय. काही बँकेतील कर्मचाऱ्यांनी सांगितलं की वरिष्ठांचा आदेश आहे की ५ हजारपेक्षा जास्तची रक्कम समाधानकारक उत्तर मिळाली तरच जमा करा. या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की उद्या जर काही गडबड झाली तर आम्हालाच पकडलं जाईल, त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी देखील ५ हजारापेक्षा जास्तची रक्कम न स्वीकारण्याचा पवित्रा घेतला.

दोन दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक नवं प्रसिद्धीपत्रक जारी केलं, ज्यात म्हटलं होतं की ज्या नोटांच्या स्वरूपात ५००० पेक्षा जास्तची रक्कम बँकेत जमा करायची असेल तर ती एकरकमी जमा करावी लागेल. ही रक्कम जमा करतेवेळीस बँकेचे अधिकारी ही रक्कम आत्तापर्यंत का भरली नाही असा प्रश्नही विचारतील असं स्पष्ट करण्यात आलं. त्यानंतर अर्थमंत्री अरूण जेटलींनी सांगितलं की एकदा रक्कम भरल्यास चौकशी होणार नाही मात्र पुन्हा-पुन्हा रक्कम भरल्यास चौकशी होईल. या उलट सुलट नियमांमुळे,परस्परविरोधी विधानांमुळे आणइ नियम आदेशातील अस्पष्टतेमुळे जनतेला प्रश्न पडलाय की आधी ‘मोदी आधी म्हणाले घाई करू नका आता विचारतायत उशीर का केलात?’