गर्भधारणेसाठी पत्नीने पतीऐवजी वापरले प्रियकराचे वीर्य


सामना ऑनलाईन । मॉस्को

गर्भधारणेसाठी जगभरात आयवीएफ या आधुनिक वैद्यकीय तंत्राचा वापर केला जाता. पण याच तंत्राचा वापर करुन पत्नीने पतीची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना रशियात घडली आहे. अॅना अनोखिना असे पत्नीचे नाव असून मॅक्सिम पतीचे नाव आहे.

अॅनाचा आणि मॅक्सिमचा विवाह ४ वर्षांपूर्वी झाला होता. पण या दाम्पत्याला मूल होत नव्हते. यामुळे डॉक्टरांनी त्यांना आयवीएफ तंत्राबद्दल सांगितले. त्यानंतर अॅना व मॅक्सिमने या तंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला. यासाठी कुलाकोव मेडिकल सेंटरमध्ये उपचार घेण्याचे त्यांनी ठरवले. आयवीएफसाठी आवश्यक तो खर्चही मॅक्सिमने केला. त्यानंतर त्यांना एक गोंडस मुलगाही झाला. यामुळे दोघेही आनंदात होते. पण या दरम्यान, अॅना व मॅक्सिममध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होऊ लागले.

काही दिवसांपूर्वी त्यांच्यात मोठा वाद झाला. यावेळी रागाच्या भरात अॅनाने मूल तुझे नसून माझ्या प्रियकराचे आहे असे मॅक्सिमला सांगितले. यामुळे मॅक्सिमला धक्का बसला. ज्याला तो स्वता:चे मूल समजून जीवापाड प्रेम करत होता ते त्याचे नाही यावर त्याचा विश्वास बसला नाही. यामुळे त्याने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने मुलाची डीएनए चाचणी करण्याचे निर्देश दिले. चाचणीनंतर मूल मॅक्सिमचे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अॅनाने न्यायालयात मूल प्रियकराचे असल्याची कबुली दिली.

तिने न्यायालयाला सांगितले की, आयवीएफ करण्यापूर्वी तिने डॉक्टरांशी चर्चा केली होती. ‘मी ज्याच्यावर प्रेम करते त्या प्रियकराचे मूल मला हवे आहे’, असा आग्रह तिने डॉक्टरांकडे धरला होता. त्यामुळे आयवीएफसाठी डॉक्टरांनी मॅक्सिमच्या वीर्याऐवजी अॅनाच्या प्रियकराचे वीर्य वापरले. त्यानंतर अॅनाला गर्भधारणा झाली. पण या चाचणीसाठी लागणारा लाखो रुपयांचा खर्च मात्र अॅनाने मॅक्सिमला करायला लावला होता. यामुळे निराश झालेल्या मॅक्सिमने कुलाकोव मेडिकल सेंटरविरोधात खटला दाखल केला. त्यानंतर न्यायालयाने रुग्णालयाला मॅक्सिमला ४.२० लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे निर्देश दिले.