अबब.. १७ लाखांचे ओठ

सौजन्य- व्लाडा इन्स्टाग्राम

सामना ऑनलाईन । मुंबई

स्त्री सौंदर्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे स्त्रीचे ओठ.. अनेक कवींना या ओठांकडे पाहून सुंदर कविता सुचल्या असतील. त्या कवितांमध्ये डाळिंबी रंगाच्या रसरशीत ओठांचं वर्णनही अनेकांनी रसिकतेने वाचलं असेल.. ऐकलं असेल.. पण, हिरेजडित ओठ असं कधी वर्णन ऐकलंय का?.. नाही.. ही कविता वगैरे काही नसून खरंच फॅशन दुनियेतला चमत्कार आहे. विशेष म्हणजे हा चमत्कार सगळ्यात महागडाही ठरला आहे.

lips

व्लाडा नामक महिला लिप डिझायनर म्हणून प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या युक्त्या वापरून ओठ सजवण्यासाठी ती ओळखली जाते. व्लाडाने एका मॉडेलच्या ओठांवर चक्क हिऱ्यांचं लिप आर्ट केलं आहे. ओठांना सजवण्यासाठी व्लाडाने निरनिराळ्या आकाराचे ८० हिरे वापरले आहेत. या हिऱ्यांची किंमत १७ लाख २२ हजार इतकी आहे. तिने तयार केलेला हा हिरेजडित लिपलूक जगातला सगळ्यात महागडा लिपलूक ठरला आहे.

व्लाडाने ओठ सजवण्यासाठी आजवर असे अनेक प्रयोग केले आहेत. जगप्रसिद्ध फॅशन मॅगझिनमध्ये जर ओठांवर एखादे आर्टिकल किंवा जाहिरात असेल तर त्यात ओठांचा मेकअप कसा असावा याबाबत ती मार्गदर्शनही करते. तसा आपल्या इथे हा ट्रेंड फारसा रुजलेला नसल्यामुळे आपल्याला याचं अप्रुप नाही. पण आंतरराष्ट्रीय फॅशनविश्वात मात्र तिच्या या कलेचं फारच कौतुक होत आहे.