दुधासाठी मुलगी टाहो फोडत होती, वैतागलेल्या आईने हत्या केली

सामना ऑनलाईन, भोपाळ

दुधासाठी मुलीने फोडलेल्या टाहोमुळे वैतागल्याने आईने मुलीचा गळा कापून तिची हत्या केल्याची भयंकर आणि धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील कुक्क्षी गावात घडली आहे. अनीता असं या निर्दयी मातेचं नाव असून तिची मुलगी अवघ्या एक वर्षांची होती. जेव्हा ही घटना घडली तेव्हा घरात कोणीच नव्हतं यामुळे ही घटना सुरुवातीला कोणालाच कळाली नव्हती. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनीता मुलीच्या रडण्यामुळे वैतागली होती, ज्यामुळे तिने धारदार वस्तूने मुलीचा गळा चिरला.

मुलीचा जीव घेतल्यानंतर काही घडलच नसल्याच्या आविर्भावात अनीता घराबाहेर पडली, घराला कुलूप लावून ती तिच्या नातेवाईकांकडे गेली. अनीता मुलीशिवाय घराबाहर पडत असल्याने आणि ती घराला कुलूप लावून जात असल्याने शेजारच्यांना संशय आला, त्यांनी जेव्हा घराचा दरवाजा तोडला तेव्हा अनीताची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांनी तातडीने तिला रुग्णालयात नेलं मात्र तिचा आधीच मृत्यू झाला होता. या मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. मुलीच्या हत्येबद्दल अनीताला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.