मंगळवेढ्यातील ‘ऑनर किलिंग’, विषारी औषध पाजून आई-बापाने ‘तिला’ मारले

2

सामना प्रतिनिधी । मंगळवेढा

सालगड्याच्या मुलाबरोबर प्रेमविवाह करणाऱ्या अनुराधाला तिच्या आई-बापाने डाळिंब पिकावर फवारायचे ‘सेव्हर’ हे विषारी औषध पाजून मारल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींनी अनुराधाला मारलेले ठिकाण दाखविले असून, घटनास्थळावरून पोलिसांनी बेडशीट, औषधाची बाटली व रिकामा ग्लास जप्त केले आहे.

सलगर येथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या अनुराधा विठ्ठल बिराजदार हिने सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याने मानहानी झालेले वडील तथा आरोपी विठ्ठल बिराजदार व सावत्र आई श्रीदेवी बिराजदार या दोघांनी ५ ऑक्टोबर रोजी पहाटे तिचा खून करून तातडीने अंत्यविधी उरकला होता. तत्पूर्वी अनुराधा हिला मलेरिया व डेंग्यू झाल्याचा बहाणा करून एका खासगी डॉक्टरकडून तिच्या रक्ताचे नमुने घेतले होते. या रक्तामध्ये कुठलाही बुधवारार दिसून आलेला नव्हता.

तपास अंमलदार सहायक पोलीस निरीक्षक वैभव मारकड, पोलीस हवालदार दत्तात्रय तोंडले, पोलीस शिपाई गुटाळ आदींनी आरोपीला सलगर येथे घटनास्थळी नेले. आरोपीने शेतातील मारलेले व अंत्यविधी केलेले ठिकाण दाखविले. अनुराधा हिला बेडशीटवर झोपवून डाळिंबाच्या पिकावर फवारायचे सेव्हर हे विषारी औषध जबरदस्तीने पाजण्यात आले होते. ते बेडशीट पोलिसांनी जप्त केले आहे. त्याचबरोबर घटनास्थळावरून पोलिसांनी विषारी औषधाची रिकामी बाटली व एक ग्लास जप्त केला आहे. आता हे विषारी औषध कोठून व कोणाच्या दुकानातून आणले याचा शोध पोलीस घेत आहेत.

जबरदस्तीने चिठ्ठी लिहून घेतली
दरम्यान, मृत्यूपूर्वी अनुराधाकडून जबरदस्तीने ‘मी स्वत: मरत आहे, माझ्या मृत्यूस कोणासही जबाबदार धरू नये,’ अशा मजकुराची चिठ्ठी आरोपींनी लिहून घेतली होती. ही चिठ्ठीही पोलिसांनी जप्त केली आहे.

अनुराधा हिला जीवे मारून तिचा अंत्यविधी करून पुरावा नष्ट केल्याने तिला कसे मारले? याचे गूढ उकलणे पोलिसांपुढे एक आव्हान होते. मात्र, खुनाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. पुढच्या टप्प्यात ज्या ठिकाणी मृत अनुराधा वैद्यकीय शिक्षण घेत होती. तसेच ज्या मुलाने विवाह केला व कुठे केला, याबाबत पुढील तपास होणे बाकी असून त्या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.