फिलिंग गिल्टी!

jyotsna-gadgil>> ज्योत्स्ना गाडगीळ

”हॅलोsss उठलं का माझं बाळ? आज मम्माला लवकर जावं लागलं बच्चा, किशी पण द्यायला विसरले, सॉरी शोना, आज येईन हं लवकर..उsssम्म्मा… तू पण दे बघू पटकन एक किशी…”

”काय झालं शोनकडी, का रडतंय माझं बाळ? बाबा ओरडले का? हॅलोsss हॅलोsss, बाबाला फोन दे बघू…!”

”मिलिंद, काय झालं? ती रडतीये का? अरे बोल नंsss न बोलून कालच्या भांडणाचा वचपा कढतोयस का? तब्येत ठीक नाहीये का तिची? डॉक्टरांकडे घेऊन जा लगेच, की शाळेत जायचं नाहीये तिला? बोल रे माणसा!”

”काय बोलू? तिचा वाढदिवस आहे आज आणि तू तिला बड्डे विश न देता निघून गेलीस, म्हणून रागवलीये ती! आज आपण बाहेर जाणार होतो, मी सुट्टी पण घेतलेली… पण तू ….!”

”हॅलोssss हॅलो मिलिंद, अरे….!”

(फोन कट) (ती हुमसून हुमसून रडायला लागली.)

” अगं, तेजु काय झालं रडायला? काय म्हणाली लेक? नवरा काही बोलला का? रडणं थांबाव बघू. ट्रेनमधल्या आजूबाजूच्या बायका बघतातेत, आधी डोळे पूस!”

” माझ्या लेकीचा आज वाढदिवस आहे गं, आणि मी विसरले! वर तिलाच बावळटासारखी विचारतेय काय झालं म्हणून. कालच तिच्या बड्डेची सगळी तयारी करून ठेवली होती. परीचा छान फ्रॉक पण आणलाय. नेमकं रात्री नवऱ्याशी नवऱ्याशी भांडण झालं आणि सकाळी त्याच नादात आवरलं आणि रागारागात निघाले. लेकीचा वाढदिवस आहे हे पण विसरले गं, कशी वाईट आई आहे मी! नवरा पण कसा वैरी असल्यासारखा वागतो बघ, सकाळी निघत असताना जाणून बुजून मला आठवणही करून दिली नाही. लेकीला काय कळणार, तिला बाबाच जवळचा वाटणार. कमी पडतेय मी, खूप कमी…’’

(असं म्हणत रडता रडता तिने फेसबुक स्टेटस टाकलं…..फिलिंग गिल्टी!)

” तेजु, तू माणूस आहेस, यंत्र नाही. रागात होतीस म्हणून तू विसरलीस, पण तयारी तर आधीच करून ठेवलेलीस ना? लेक आत्ता रागवलीय, पण तू समजवलंस की होईल शांत, एवढं टेन्शन नको घेऊ! हे तू काही मुद्दाम केलं नाहीस, मग एवढा गिल्ट कशासाठी? आपल्या बायकांना सवयच लागलीये, प्रत्येक गोष्ट स्वतःवर ओढवून घेण्याची! सगळ्यात आधी हा सुपर वुमन सिंड्रोम काढून डोक्यातून टाक बरं! सगळं एकहाती करण्याच्या नादात आपण स्वतःचाच त्रास वाढवून घेतोय. ‘सगळं मी करतेय’ या जाणिवेने अहं सुखावतोय, पण नाती दुरावतातेत. लेकीला भरवणार तूच, खेळवणार तूच, अंघोळ घालणारही तूच…! कशाला? घरचे आहेत की, त्यांनाही घेऊ देत जबाबदारी. तू नसताना चिऊला तेच सांभाळतात नं? मग कशाला सारखी तू पुढे पुढे करतेस? कुटुंबं सगळ्यांचं आहे ना? मग सगळ्यांनी एकोप्यानेच वागायला हवं!”

”अगं, पण खरंच वेळ देता येत नाही तिच्यासाठी!”

” कसा देणार? अर्ध्याहून अधिक वेळ आपला प्रवासात जातो, ऑफिसात जातो, घरकामात जातो, मग रोजच्या कुरबुरी असतातच! हा प्रश्न फक्त नोकरी करण्याऱ्या बायकांचा नाही, तर अगदी गृहिणींचाही आहे. त्या तर बिचाऱ्या घरी असूनही मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. कारण, ‘तू काय घरीच असतेस, मग हे बिल भर, ते बिल भर, बँक बुक भर, पासबुक भर’, अशी घरच्यांची शेकडो कामं तिच्या एकटीवर पडतात. त्यामुळे त्याही मुलांना वेळ देऊ शकत नाही, हा गिल्ट त्यांनाही असतोच! खरं तर, आताची पिढी खूप हुशार आणि समजूतदार आहे. आपल्याला वाटतं त्यांना काही कळत नाही, पण त्यांचं आपल्या प्रत्येक कृतीकडे बारकाईने लक्ष असतं. ते आई आणि बाबांना छान समजून घेतात. फक्त सुटीच्या दिवशी तरी आपल्या पालकांनी आपल्याला भरपूर वेळ द्यावा असं त्यांना वाटतं आणि आपण नेमके एकच दिवस सुट्टी म्हणून झोपून अर्धा दिवस संपवतो, मग टीव्ही, मोबाईल, शॉपिंग… करत करत संपली सुटी! तो वेळ मुलांना कसा देता येईल याचा प्रत्येक पालकांनी विचार करायला हवा. ते जर छान मॅनेज करता आलं, तर गिल्ट फील येणार नाही! कळलं?? चल आता, सीएसटी आलं!”

” थँक्स संजू! बोलून मोकळं वाटलं. तू जा, मी ह्याच गाडीने रिटर्न जाते घरी आणि लेकीला सरप्राईज देते! आज तिचा दिवस आहे, तिला वेळ दिलाच पाहिजे!”

”बरं, बरं चालूदे तुमचं माय-लेकीचं! माझ्याकडूनही विश कर तिला. बाsssय.”

(डोळे पुसत पुसत तिने बॉसला येत नसल्याचा मेसेज केला आणि फेसबुक स्टेटस अपडेट केलं… फिलिंग हॅप्पी!)

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. [email protected]