बॉलिवूड तारकांना ट्रेनिंग देणाऱ्या महिला बाईक रेसरची आत्महत्या

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूड तारकांना बाईक रेसिंगचे धडे देणाऱ्या प्रसिद्ध महिला बाईक रेसर आणि प्रशिक्षक चेतना पंडित (२७) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती गोरेगाव पूर्वला पद्मावती नगरमध्ये भाड्याच्या घरामध्ये राहात होती. मंगळवारी रात्री ही घटना उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी चेतनाने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली असून त्यात तिने प्रियकरासोबत झालेल्या ब्रेकअपमुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतना गोरेगावमध्ये आपल्या मैत्रिणीसोबत भाड्याच्या घरामध्ये राहात होती. मंगळवारी रात्री तिची मैत्रीण घरी आली तेव्हा दरवाजा आतून बंद होता. वारंवार बेल वाजवल्यानंतरही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. चेतनाचा मोबाईलही बंद होता. मैत्रीणीला शंका आल्याने तिने याची माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर डुप्लीकेट चावी बनवणाऱ्याच्या मदतीने घराचा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. चेतनाने घरातील पंख्याला गळफास घेतला होता. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत चेतनाला रुग्णालयात भरती केले परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

चेतना ही मुळची कर्नाटकमधील शिमोगा येथील रहिवासी असून कामाच्या निमित्ताने ती अनेक वर्षापासून मुंबईमध्ये वास्तव्यास होती. ती एक उत्तम बाईक रायडर होती. रॉयल एनफिल्ड बाईक चालवण्यात तिचा विशेष हातखंडा होता. चेतनाने ‘धुम’ चित्रपटातील अभिनेत्री कतरिना कैफ, ‘जब तक है जान’ या चित्रपटातील अभिनेत्री अनुष्का शर्मा, ‘एक विलेन’ चित्रपटातील अभिनेत्री श्रद्धा कपूर तसेच बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितलाही बाईक रायडींगचे प्रशिक्षण दिले होते.