नाकाबंदीत मोटारसायकलस्वाराने पोलिसाला दिली धडक

4

सामना प्रतिनिधी, मुंबई

वांद्रे कार्टर रोड येथे नाकाबंदीदरम्यान मोटारसायकलस्वाराने पोलिसाला धडक दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रल्हाद पांडुरंग जमादार हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णलयात उपचार सुरू आहेत. जमादार हे खार पोलीस ठाण्यात डय़ुटीला आहेत. 1 फेब्रुवारीला ते कार्टर रोड येथील सीसीडी पॉइंट येथे गस्तीला होते.

हेल्मेट कारवाईदरम्यान ते कारवाईकरिता उभे होते तेव्हा अब्दुल शेख हा विनाहेल्मेट मोटारसायकल चालवत येत होता. त्याला जमादार यांनी थांबवण्यास सांगतिले तेव्हा शेखच्या मोटारसायकलने जमादार यांना जोरदार धडक दिली. या धडकेत जमादार हे जखमी झाले. जखमी अवस्थेत जमादार यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल झाले. अपघातात त्यांच्या पायाला इजा झाली आहे. खार पोलिसांनी शेखला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.