सुखद सायकल सफर

>>वैष्णवी कानविंदे- पिंगे

नेत्रसुखद, हळूवार, कधी मंद हसवणारी, कधी उगाचच हळहळ लावणारी, टवटवीत चेहऱयाची कथा जर आपल्या वाटय़ाला आली, ती देखील घसघशीत सुट्टीच्या मे महिन्यात तर छान वाटतं. काहीतरी सुट्टी योग्य गवसल्याचा आनंद होतो. त्या गोष्टीचा जीव कितीही छोटा असला तरी त्यातनं मिळणारा आनंद मात्र अगदी खराखुरा असतो…

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सायकल’ या सिनेमाबद्दलही असंच काहीसं म्हणता येईल. काही मर्यादा असल्या तरीही ही गोड, देखणी हळूवार कथा आपल्याला नक्कीच आनंद देते आणि हळूवारपणे जपून ठेवावे असे क्षणही या सिनेमातनं गवसतात. ही कथा घडते ती साधारण पन्नासच्या दशकात. त्या वेळचं कोकण आणि त्या काळातला कोकणी माणूस. ज्या काळात माणसाचा माणसावर विश्वास असायचा. एकमेकांच्या नात्यातलं प्रेम खरंखुरं असायचं आणि ते जपण्यातही सहजता होती. देवावरचा विश्वास हा फक्त भीतीपोटी नव्हता, थोडक्याच गरजा आणि त्यातही सुखी असणारा परिवार आणि प्रत्येक सुखदुःखात आनंद शोधणारी माणसं… या काळातला हा सिनेमा.

तर अशाच कोकणातल्या एका निसर्गरम्य, छोट्याशा खेड्यात रहाणाऱ्या एका ज्योतिष पंडिताची ही कथा. त्याचं ज्योतिष शास्त्रातलं ज्ञान आणि त्याच्यात असलेली परोपकाराची भावना यामुळे त्याच्याबद्दल त्याच्याच नाही तर आजूबाजूच्या गावातल्या लोकांनाही आदर, प्रेम असतं. सगळय़ांना जमेल तशी मदत करताना आपलं घर, पत्नी, छोटुली मुलगी आणि वडिलांसोबत सुखाने रहाणाऱ्या या ज्योतिषाकडे त्याला त्याच्या आजोबांनी दिलेली सायकल असते. आपल्या या देखण्या सायकलीला तो जिवापलीकडे जपत असतो. त्याचं हे सायकलप्रेम सगळय़ांना ठाऊक असतं आणि या सायकल वेडाची लोकं गंमतही करत असतात पण तितकाच आदरही करत असतात. एकूणच ज्योतिष पंडिताची विद्या, त्याच्यातली परोपकारी वृत्ती आणि त्याचं आंधळं सायकल प्रेम हे सगळय़ा पंचक्रोशीला ठाऊक असतं. पण अचानक एक दिवस त्याची सायकल चोरीला जाते. त्याच्या सायकल चोरीला जाण्याने त्याच्यावर आभाळ कोसळतं आणि इतर कितीही मोठय़ा गोष्टींची चोरी झाली असली तरीही त्याची सायकल चोरीला गेलीय हे ऐकून सगळं गावच हादरतं. दुसरीकडे सायकलचोर सायकल घेऊन या गावातनं त्या गावात प्रवास करायला लागतात. वाटेत त्यांना अनेक माणसं भेटतात आणि त्या सायकलच्या ओळखीमुळे त्यांना नवीन ओळख मिळायला लागते. बघता बघता ती सायकल त्या चोरांचं जगच बदलून टाकते…. ती सायकल नेमकी काय करते, ती त्याच्या मूळ मालकाला परत मिळते का, चोर तीच सायकल का चोरतात आणि त्यामुळे नेमकं काय काय होतं… याचा गमतीशीर प्रवास म्हणजे हा सिनेमा.

हा सिनेमा अगदी पहिल्या दृष्यापासून हलकाफुलका, नर्म विनोदाची पाखरण असणारा असा आहे. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही की बटबटीत दृष्यं नाहीत. त्यामुळे एखाद्या मंद पण सुरेल सुरांसारखा तो मनावर राज्यं करतो. दिग्दर्शक प्रकाश कुंटेची स्वतःची अशी एक शैली आहे. सिनेमाला मांडताना त्यातलं प्रत्येक दृष्य बारकाईने रेखित करणं आणि त्यातले हळवे, तात्त्विक क्षणी अलगद अधोरेखित करणं ही त्यांची पद्धत या सिनेमातही पहायला मिळते. या सिनेमाची उजवी आणि खणखणीत बाजू म्हणजे त्याचं छायांकन. अप्रतिम प्रकाशयोजना, प्रत्येक फ्रेमचं सौंदर्य आणि देखणेपणात कुठेही कसर न सोडणारा कोकण अमलेंदु चौधरीने नेहमीच्याच जादूने उभा केलाय. पिवळय़ा रंगाची सायकल आणि त्या पार्श्वभूमीवरचा कोकणातला हिरवाकंच निसर्ग, कधी उफाळणारा समुद्र किनारा, कधी गावचा कट्टा तर कधी दगडी पार्श्वभूमी अशा फ्रेम्स छानच जमून आल्या आहेत.

ऋषीकेश जोशीने त्याच्या नेहमीच्याच शैलीत झक्कास भूमिका वठवली आहे. त्याचं चांगुलपण, घरच्यांवरचा विश्वास, मुलीशी असलेलं नातं, स्वभावातला एक गोड निरागसपणा आणि सायकल प्रेम अगदी फर्मास उभं केलंय. त्याच्या बायकोच्या भूमिकेत असलेल्या दीप्ती लेलेच्या वाटय़ाला फार थोडी भूमिका. पण ती दिसलीय छान. लहानगी मैथिली पटवर्धन तर अगदी पक्की लक्षात रहाते. प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम यांनीही चोराच्या भूमिकेत धमाल आणली आहे. एकूणच अभिनयाच्या बाबतीतही सिनेमा अगदी उत्तम वठला आहे. पण गोष्ट उभी करताना मात्र एकूणच जीव कमी असल्याने या सिनेमाला मर्यादा आल्या आहेत. सिनेमाची कथा अगदी नाजूक आहे. एखाद्या लघुकथेसारखी. लघुकथा जेवढी त्याच्या छोटय़ाशा अवकाशात खुलून दिसते तेवढीच जेव्हा संपूर्ण सिनेमाच्या पटावर उलगडायचा प्रयत्न होतो तेव्हा ती कुठेतरी विनाकारण खेचल्यासारखी वाटायला लागते. तसंच काहीसं या सायकलीच झालंय.

पहिल्या अर्ध्या भागात विशेष काही घडतच नाही. गोष्ट उभी करण्यासाठी आणि पार्श्वभूमी अधोरेखित करण्यासाठी म्हणून जी पटकथा लिहीली गेलीय त्यात कारण नसताना लांबण लागलंय. त्यामुळे ती दृष्यं हवा तसा प्रभाव सोडतच नाहीत. शिवाय त्या काळच्या कोकणात बहुतेक घरावर असणारा कोंकणी भाषेचा पगडाही काही अपवाद वगळता संवादांमधून उमटत नाही. त्यामुळे लिखाणाच्या फुटपट्टीवर हा सिनेमा थोडा तोकडा पडतो. पण एकूणच देखणेपणा, हळूवारपणा इत्यादी गोष्टी असल्या तरी या कथेला प्रेक्षक मनात पूर्णपणे रुजायला कुठेतरी मर्यादा पडतात एवढं मात्र नक्की.

आणखी एक मुद्दा म्हणजे सायकल प्रेम अधोरेखित करण्यासाठी जी दृष्यं उभी केली आहेत ती छान जमली आहेत. म्हणजे सावकाराने केलेली मस्करी असो किंवा सायकल चोरीला गेलीय हे कळल्यावर गाव धावत जातं ते दृष्यं असो. पण झालंय असं की ही दृष्यं एवढी खमकी असताना नेमकं पुढे जेव्हा सायकलचोर लोकांना भेटतात तेव्हा त्यांना सायकल चोरीला गेलीय हे ठाऊकच नसतं. म्हणजे सायकल बद्दलचा प्रचंड बोलबाला आणि नंतर चोर ज्या सहजतेने सायकल घेऊन फिरतात ती दृष्यं ही अगदी परस्परविरोधी होतात. त्यामुळे सिनेमा सहज न घडता घडवून आणल्यासारखा समोर येतो. इतक्या सहज लोकं एकमेकांना भेटतात. इतकंच नाही तर सायकलच्या शोधात निघालेला सायकल मालक आणि चोरही एकमेकांना परत परत भेटतात पण तरीही सायकलचा ठाव लागत नाही हे काही पटत नाही. दिग्दर्शकाने या बारकाव्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. तसंच काळ उभा करताना काही बारकावे अधिक दाखवले असते तर अजून लज्जत वाढली असती. अर्थात या सिनेमाची लांबी फारशी नसल्यामुळे या गोष्टी रसग्रहणात तितकासा व्यत्यय आणत नाहीत. एकूणच सायकल या सिनेमात काही त्रुटी किंवा काही मर्यादा नक्कीच आहेत. पण एकूण विचार केला तर सायकलचा हा प्रवास सुखददेखील आहे. करमणुकीसाठी या सायकलची सफर अनुभवायला काहीच हरकत नाही.