हाऊसफुल्ल : तरल स्वप्नांचा भडक देखावा

>> वैष्णवी कानविंदे – पिंगे

सिनेमा हा समाजात घडणार्‍या कुठल्या तरी स्तराचंच चित्रण करतो. मग समाजातला आरसा सिनेमातून दाखवताना प्रेक्षक त्या सिनेमाशी खिळून कसा राहील, पर्यायाने त्यात नाट्य कसं आणता येईल हे त्या दिग्दर्शक, लेखक वगैरे मंडळींचं कसब. यशस्वी होण्यासाठी कधी डोळ्यांत अश्रू, कधी ओठांवर हसू, कधी उत्कंठता, कधी समाधान वगैरे भावना खेळवत सिनेमा नाट्यमयरीत्या रंगवावाच लागतो, पण हे जरी खरं असलं तरी त्या भावनाकल्लोळाच्या प्रेमात पडून ते नाट्य ‘महा (भडक) नाट्य’ होणार नाही ना याची जाणीव असणंही तितकंच महत्त्वाचं. नाहीतर तो सिनेमा सगळ्या भावनांच्या पलीकडे जाऊन फक्त कपाळावर आठय़ा आणणारा ठरतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ट्रकभर स्वप्नं’ या सिनेमाची गाडीही अतिरंजित नाट्याच्या रस्त्यावर अशीच घसरत गेली आहे.

या सिनेमाची मूळ कथा खरं तर खूप वास्तववादी आहे. अर्थात त्यात नावीन्य असं काही नाही, पण या विषयात नावीन्य नसलं तरी वेगळी मांडणी त्याला पुनर्जीवन नक्की देऊ शकते, पण वेगळी मांडणी म्हणजे निव्वळ मेलोड्रामा नाही हेदेखील सिनेमा बनवणार्‍यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अनेक छोट्या गावांमध्ये राहणारे मोठी स्वप्नं घेऊन मुंबईत येतात. मग एकदा स्वप्ननगरीत आल्यावर मूळ स्वप्न पूर्ण होवो न होवो, पण त्यात भर पडतच जाते आणि मग कधी त्या स्वप्नांचा डोंगर उभा राहतो आणि त्या खाली तो स्वतः गाडला जातो ते कळतही नाही. मग स्वप्नं बघायचीच नाहीत का, बघितली तर ती कशी बघायची, किती बघायची, किती वाहवत जायचं आणि कुठे सावरायचं याची गोष्ट म्हणजे ‘ट्रकभर स्वप्न’ हा सिनेमा.

जेवणात मीठ आवश्यक असतं, पण ते किती घालायचं याचं एक प्रमाण असतं. कमी पडलं तर अळणी आणि जास्त पडलं तर खारटपणा टाळता येत नाही. ‘ट्रकभर स्वप्नं’ हा सिनेमा असाच खारटपणाकडे झुकलाय. त्यात एवढं जास्त मीठ आहे की, त्यामुळे त्याची मूळ चव नाहीशी झालीय. या सिनेमात मकरंद देशपांडे आहे, पण मकरंदचा अभिनय तितकासा खुललाच नाही. सरळसाध्या स्वभावाची व्यक्तिरेखा त्याला दिली आहे, पण त्यात ठामपणा नाही. त्यामुळे इतका सरळ माणूस जेव्हा अचानक बिल्डरकडे जातो तेव्हा ते केवळ स्क्रिप्टमध्ये लिहिल्यामुळे हे स्पष्टपणे जाणवतं. बरं, आजवर मकरंद देशपांडे त्याच्या बहुतेक सिनेमा किंवा कलाकृतींमध्ये जसा दिसलाय आणि जसा वावरलाय अगदी तसाच या सिनेमातही वावरलाय. त्यामुळे ती व्यक्तिरेखा म्हणून जराही रंगलेली नाही. उलट, त्याचा वावर, त्याचं बोलणं, वागणं बर्‍याच ठिकाणी खटकतंच. या सिनेमात बडे कलाकार तर आहेत, पण त्यांची कामं जेवढ्यास तेवढी. स्क्रिप्टमध्ये लिहिल्याप्रमाणे झाली आहेत. वस्तीचा दादा असो, बडी हिरॉईन असो, तिचा श्रीमंत नवरा, अशा अनेक व्यक्तिरेखा या कचकड्याच्या वाटतात. म्हणजे त्या समाजात तशा असतात असा सार्वत्रिक समज आहे म्हणून तशा उभ्या केल्या आहेत. त्या साचेबद्ध मसालेदार सिनेमांमध्ये कायमच असतात. या सिनेमात चांगलं काम केलंय क्रांती रेडकर आणि स्मिता तांबे हिनं. क्रांतीनं पकडलेला आणि शेवटपर्यंत टिकवलेला सूर, वस्तीतल्या स्त्रीचं जगणं क्रांतीने आणि त्याच वस्तीत राहून आलेल्या बेफिकिरीची झलक स्मिता तांबे  हिने खूप छान वठवली आहे. त्या दोघींच्या कामाला पूर्ण मार्क.

ही कथा सरळधोपट असली तरी त्याची पटकथा लिहिताना आणि काही अंशी संवाद लिहिताना. या सगळ्यावर दिग्दर्शनाचा साज चढवताना आणि मग संकलन करतानाही गडबड झाली आहे. बर्‍याचशा गोष्टी जशा बोलल्या जातात तशा प्रत्यक्षात वेगळ्याच काहीतरी दिसतात. म्हणजे पैसे द्यायचे असतात, पण थोडे थोडे देताना त्या पैशांचा हिशेब बहुधा दिग्दर्शकाच्या मनातूनही गेलाय की काय असं वाटायला लागतं. काही भावनिक संवाद इतके अजीर्ण होतात की, त्या ठिकाणी हसायला यायला लागतं. आई मुलीला साधे फ्रॉक घालायला देत नाही आणि त्याच वस्तीमध्ये प्रक्षोभक कपडे घालून ती नाचायला कशी देते? असे प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाहीत. तेच बार डान्समधला अचानक येणारा मोकळेपणा अशी सगळी दृष्यं पाहून एकूणच हा सिनेमा खूप वरवरचा झालाय हे प्रकर्षाने जाणवतं. त्यात एका भडक दृष्यामागे दुसरं भडक दृष्यं. मग तिसरं. अशी जोडाजोडी केल्यामुळे बर्‍याच ठिकाणी कानठळ्याही बसतात. निदान दृष्यांमध्ये काही ठिकाणी समतोल राखला असता तरी एकूण सिनेमा सह्य झाला असता. पहिल्या अर्ध्या भागात तर काहीच घडत नाही. फक्त वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आखल्या जातात आणि दुसर्‍या अर्ध्या खूप मेलोड्रामा घडतो आणि सिनेमाचा समतोल त्यामुळे अधिकच ढासळतो.

या सिनेमाचं काही ठिकाणी छायांकन चांगलं झालंय. गाणीदेखील तशी बरी आहेत, पण त्या शिदोरीवर सिनेमा तग धरू शकत नाही. एकूणच ‘ट्रकभर स्वप्नं’ साकारताना दिग्दर्शकाने ट्रकभर भावनांची भरणा केली नसती तर सिनेमाचा ट्रक किमान सरळ रेषेत तरी चालला असता.

सिनेमा : ट्रकभर स्वप्नं

निर्माते : मीना चंद्रकांत देसाई,  नयना देसाई

दिग्दर्शक : प्रमोद पवार

पटकथा,  संवाद : प्रवीण तरडे

संकलन : प्रशांत खेडकर

छायांकन : राजीव जैन

कलाकार:  मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर, आदिती पोहनकर,

मुकेश ऋषी, आशा शेलार, स्मिता तांबे, मनोज जोशी, विजय कदम