सावधानतेचा विनोदी डोस

वैष्णवी कानविंदे-पिंगे

मुलगा मुलीला पसंत करतो, मुलगी मुलाला पसंत करते. घरचे एकमेकांना पसंत करतात. घरचं, देण्याघेण्याचं, जातीपातीचं सगळं व्यवस्थित आहे हे बघून हात पिवळे करून देण्यात येतात… म्हणजे एवढय़ा सगळय़ा बाबींवर लग्नं जमतात. पण लग्न झाल्यावर जर मुलामध्ये काही शारीरिक आणि तोही लैंगिक दोष असेल तर काय… आपल्या विवाह संस्थेत असा विचार लग्नाआधी केलाच जात नाही. याच गंभीर आणि नाजूक विषयाभोवती द्वैअर्थी संवाद आणि धमाल दृश्यांची सुबक वीण घालत रचलेला सिनेमा म्हणजे शुभ मंगल सावधान.

दिल्लीला राहणाऱया एका चारचौघांसारख्या मुलाची ही कथा. त्याचं एका मुलीवर प्रेम बसतं, पण तिला ते सांगावं कसं या पेचात त्याला तिच्यापर्यंत पेम पोचवणं शक्यच होत नाही. पण त्याचवेळी इंटरनेटवर विवाहस्थळांच्या संकेतस्थळांमध्ये तिचं स्थळ सापडतं. त्या माध्यमातनं तिला मागणी घातली जाते. कुटुंबं भेटतात आणि मग साखरपुडय़ापर्यंत सगळं व्यवस्थित पार पडतं. पण त्यानंतर काही घटना घडतात आणि त्या मुलाला लैंगिक दोष आहे हे त्या मुलीला कळून चुकतं. तिच्यायोगे तिच्या कुटुंबाला कळतं आणि सगळीकडे एकच गोंधळ उडतो. मुलीच्या घरचे लग्नाचा प्रस्ताव मागे घ्यायचा निर्णय घेतात. पण त्या मुलाला मात्र याच मुलीशी लग्न करायचं असतं आणि त्यासाठी ‘तो’ प्रश्न सोडवायला त्याचे अथक प्रयत्न सुरू होतात. तीदेखील त्याला मदत करते आणि मग सुरू होते गंमतीदार धावपळ… ती  धावपळ काय, मग लग्नाचं नेमकं काय होतं आणि ‘त्या’ प्र्रश्नाचा गुंता कसा सुटतो, हे पाहायला हा सिनेमा पाहायलाच हवा.

मुळात हा विषय अतिशय गंभीर आणि विचार करायला लावणारा आहे. विवाहेच्छुक मुलं- मुली आणि लग्नाचा बाजार ज्या पद्धतीने भरतो आणि त्यात जे जे व्यवहार चालतात त्यात हा महत्त्वाचा प्रश्न कसा आणि किती हाताळला जातो हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याच विषयावर अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीने दिग्दर्शकाने हा सिनेमा बनवलाय. मुळात अशा प्र्रकारचे प्रश्न ठाऊक असले तरी लपवण्यात येतात आणि नंतर आयुष्यभर मुलींना सामना करावा लागतो. समाजाची भीती, लज्जा, आपलं पुढे काय होणार आणि पुरुषप्रधान संस्कृती यामुळे तोंड दाबून बुक्यांचा मार अशी अवस्था होते. पण याच अवस्थेवरचा वेगळा प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय म्हणावा लागेल. मुळात असे सिनेमे करताना खूप काळजी घ्यावी लागते. अश्लीलता आणि लैंगिकता यातली सुक्ष्म रेषा लक्षात ठेवून त्यावर निखळ विनोदाची झालर चढवणं आणि त्याचसोबत गंभीर प्रश्नाला पृष्ठभागावर आणून दाखवणं हे अजिबात सोपं नाही आणि या सगळय़ा कसरतीसाठी दिग्दर्शकाचं मनापासनं कौतुक.

या सिनेमाची कथा महत्त्वाची आहेच. पण हा सिनेमा खुललाय तो त्यातल्या संवादांच्या करामतीमुळे. यातले द्वैअर्थी, अतिशय विनोदी प्र्रासंगिक संवाद सिनेमा संपला तरी लक्षात राहतात आणि आपल्या चेहऱयावर हसू उमटवतात.

या सिनेमाचे कलाकार ही या सिनेमाची आणखी एक सशक्त बाजू. आयुषमान खुराणा आणि भूमी पेडणेकर हे दोघेही लोकप्रिय कलाकार असले तरीही त्यांच्यामध्ये सर्वसामान्यांना भावेल आपलंसं वाटेल असं काहीतरी आहे. त्यामुळे त्यांना घेऊन रचलेली गोष्ट लगेच भावून जाते. या दोघांचाही सहज अभिनय आणि एकमेकांसोबत असणारी केमिस्ट्री नक्कीच वाखणण्याजोगी आहे. त्यांच्या व्यतिरिक्त काकाच्या भूमिकेतील ब्रिजेंद्र काला हा अभिनेता किंवा मुलीची मम्मी या शब्दाला अगदी साजेशी दिल्लीवाली मम्मी रंगवणारी अभिनेत्री सीमा पाहवा ही बहारदार. त्यांच्या संवादासकट ते लक्षात राहातात.

छायांकन, दिल्लीचं चित्रण छान जमलंय. तर गाणी तशी बरी असली तरी कान्हा आणि रॉकस्टार सय्या हे गाणं विशेष भावतं. सिनेमाच्या गाण्यांचं छायांकन खूप सुंदर झालंय. सिनेमा संपूर्णपणे शिक्षण देता देता यथेच्छ करमणूक करतो यात वादच नाही. पण तरीही या सिनेमाने काही बाबींकडे जरा अधिक लक्ष पुरवलं असतं तर त्याचा बहार अधिक खुलला असता हेदेखील तितकंच खरं… म्हणजे सिनेमाचा पहिला भाग मध्यांतराच्या आधीचा भाग कमाल आहे. पोट धरून हसायला एकदम फक्कड जमून आलाय. पण तोच प्रभाव मध्यांतरानंतर उरत नाही. मध्यांतरानंतर सिनेमा बरा असला तरीही पहिल्या भागात जी मजा येते त्या अपेक्षा अगदीच सपक होऊन जातात. तिथे जर सिनेमाच्या पटकथेने खंबीरपणे पाय रोवले असते तर ‘शुभमंगल सावधान’ नक्कीच एक मास्टरपीस झाला असता. कदाचित मध्यांतरानंतर विषयाला गंभीर वळण लागल्याने तसं झालं असेल. पण त्यामुळे सिनेमाचा रसास्वाद कमी होत नाही हे नक्की.

थोडक्यात काय, ‘शुभमंगलं सावधान’ हा विकेंडच्या करमणुकीसाठी फक्कड सिनेमा आहेच. पण विवाहेच्छुक तरुण- तरुणींनी एक संदेश म्हणून जरूर पाहावा. इतकंच नाही तर मुलांची लग्न जुळवण्यासाठी वेगवेगळी परिमाणं शोधणाऱया पालकांनीही हा सिनेमा जरूर पाहावा. एक चांगला विनोदी आणि सावधान करणारा हा प्रयत्न नक्कीच आनंद देईल.

  • दर्जा-अडीज स्टार्स
  • सिनेमा–शुभ मंगल सावधान
  • निर्माता–आनंद एल. राय, क्रिशिका लुल्ला
  • दिग्दर्शक/ कथा -आर. एस. प्रसन्ना
  • लेखक–हितेश केवल्य
  • संगीत- तनिष्क-वायू
  • छायांकन -अर्जून राकेश धवन
  • कलाकार -आयुषमान खुराना, भूमी पेडणेकर, शुभांकर  त्रिपाठी, ब्रिजेन्द्र काला,अन्शुल चौहान.