मुख्यमंत्री हाजीर हो! एम.पी. मिल कंपाऊंडप्रकरणी लोकायुक्तांकडून चौकशी

सामना प्रतिनिधी, मुंबई

एम.पी. मिल कंपाऊंड एसआरए घोटाळ्याप्रकरणी लोकायुक्तांकडून गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी होणार आहे. कारण या प्रकल्पाला मंजुरी देताना मुख्यमंत्र्यांनाही कल्पना दिली होती, असा शेरा मेहता यांनी मारला होता. त्यामुळे लोकायुक्तांना चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनाही बोलावणे धाडावे लागणार आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एम.पी. मिल कंपाऊंड घोटाळा गाजला होता. प्रकाश मेहतांच्या राजीनाम्यावरच विरोधी पक्ष अडून बसला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची लोकायुक्तांमार्फत चौकशी केली जाईल, असे जाहीर केले होते. पण आता मुख्यमंत्र्यांनाही या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. मुख्यमंत्र्यांना कल्पना दिल्याचा दावा करणाऱ्या मेहता यांनी ही फाइलच मुख्यमंत्र्यांना दाखवायचे राहून गेले होते, असाही दावा केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना खरोखरच कल्पना दिली होती का याची चौकशीही लोकायुक्तांना करावी लागणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांनीही लोकायुक्तांनी चौकशीसाठी बोलावल्यास निश्चितच त्यांच्यासमोर जाऊ, अशी तयारी दर्शवल्याचेही सूत्रांकडून समजते.

माजी मुख्य सचिनांच्या अध्यक्षतेखाली मोपलवारांची चौकशी
ऑडीओ क्लिपवरून वादग्रस्त ठरलेले एमएसआरडीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्या चौकशीसाठी माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती एक महिन्याच्या आत चौकशी अहवाल सरकारकडे सुपूर्द करणार आहे. माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या चौकशी समितीत मुंबई दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ आणि आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त आशुतोष डुंबरे यांचा समावेश आहे.