खासदार नाना पटोले यांची पश्‍चाताप यात्रेच्या समारोपात राजकीय दिशा ठरणार

सामना प्रतिनिधी । नागपूर

भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांना शाब्दिक बाणांनी घायाळ करणारे व नुकतेच भाजपातून बाहेर पडलेले माजी खासदार नाना पटोले हे येत्या १२ जानेवारीपासून सिंदखेडराजा येथून पश्‍चाताप यात्रा काढणार आहेत. ही यात्रा भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे समाप्त होणार आहे. या समारोपाच्या कार्यक्रमातच नाना पटोले यांची राजकीय दिशा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे भाजपातील काही नाराज नेते या यात्रेत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी भाजपाला रामराम करीत भंडारा गोदिंया लोकसभा क्षेत्रातील भाजपाचे खासदार नाना पटोले बाहेर पडले. त्यांनी खासदारकीचाही राजीनामा दिला आहे. भाजपाने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती. मात्र, आता भाजपाला त्याचा विसर पडल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. नाना पटोले येत्या १२ जानेवारीपासून बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथून पश्‍चाताप यात्रा सुरू करणार आहेत. ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला म्हणजे १९ फेब्रुवारीला साकोली येथे समाप्त होईल. विदर्भातील सहा जिल्ह्यातून निघणाऱ्या या यात्रेतून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थानापासून ही यात्रा काढली जाणार आहे. या यात्रेनंतर पटोले यांच्या राजकीय मार्गाची दिशा स्पष्ट होणार आहे.

राजकीय दिशा होणार स्पष्ट
खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पटोले यांनी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांची भेट घेतली होती. गुजरातमधील राहूल गांधी यांच्या सभेतही ते सहभागी झाले होते. पश्चाताप यात्रेच्या समारोप कार्यक्रमात कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना बोलावून कॉंग्रेस प्रवेश होईल, असे बोलले जात आहे. पटोले यांचा कॉंग्रेस प्रवेश कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये व्हावा, यासाठी आग्रही असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

पक्षबांधणीसाठी केजरीवालांचा दौरा
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील १२ जानेवारीला महाराष्ट्रतील सिंदखेड राजा येथे येणार आहेत. येथे आपची महाराष्ट्र संकल्प सभा होणार आहे. महाराष्ट्रात पक्ष बांधणी व विस्ताराच्या मोहिमेला या दिवशी सुरूवात केली जाणार आहे. दिल्लीनंतर आता केजरीवाल महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत करणार आहेत.

देशमुखानंतर कुंभारेकडे लक्ष
विदर्भात भाजपमध्ये नाराजांची संख्या वाढत आहे. माजी खासदार नाना पटोले यांनी थेट बंडाचा झेंडा फडकाविला. त्यानंतर काटोलचे भाजपाचे आमदार आशीष देशमुख यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. आता विकास कुंभारे हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे. हलबा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून आमदार कुंभारे यांनी सरकारवरच टीकास्त्र सोडले होते. समाजासाठी आमदारकी सोडेन असा निर्वाणीचा इशारा कुंभारेंनी दिला. आमदार कुंभारे कॉंग्रेस नेत्यांच्या संपर्कात असल्याची कुजबूज आहे. दरम्यान, कुंभारे यांनी मात्र अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. सदर विषयावर जाहीर बोलणेही त्यांनी टाळले आहे.

तर भाजपाला बसेल फटका
गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला विदभार्तून भरघोस मते मिळाली होती. विदर्भातील लोकसभेच्या सर्व दहाही जागा भाजपा- सेना युतीच्या पदरात पडल्या. यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही विदर्भातून भाजपाचे ४४ आमदार निवडून आले. यात बहुजन नेत्यांची संख्या अधिक आहे. यातील बहुतेक आमदार काँग्रेसमधून भाजपात आलेले आहेत. कॉंग्रेसमधून आलेल्यांपैकी एकालाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. यातूनच नाराजीचे फटाके फुटायला सुरुवात झाली. या नाराजांची नाराजी दूर करण्यात भाजपाला यश आले नाही तर आगामी निवडणुकीत त्याचा फटका बसेल, असा राजकीय धुरिणांचा अंदाज आहे.