भाजपने माझा वापर केला, खासदार संजय काकडेंची राष्ट्रवादीशी जवळीक

10


सामना ऑनलाईन । पुणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी मोठ्या भावासारखे समजत होतो, परंतु भाजपने माझा वापर केला असा आरोप खासदार संजय काकडे यांनी केला आहे. सोमवारी संजय काकडे यांनी राष्ट्रवादी नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलाताना काकडे यांनी भाजपकडून तिकीट मिळाले नाही तर अनेक पर्याय उपलब्ध असल्याचे म्हणत राष्ट्रवादीच्या जवळीकतेचे संकेत दिले आहेत.

पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर अन्यायच केला आहे. दोघांनी मला कायमच डावलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला मोठ्या भावासारखे आहे, परंतु या दोघांचे ऐकून त्यांनी लाथ मारली तर मला दुसरे घर शोधावंच लागणार, असा इशारा संजय काकडे यांनी दिला.

सोमवारी मी अजित पवार यांना भेटलो. त्यांचे राजकीय वजन मला ठाऊक असून मुख्यमंत्र्यांनी डावलले तर माझा मार्ग मोकळा असेल असे काकडे यांनी स्पष्ट केले. तसेच भाजप कार्यकर्त्यांकडून आणि नगरसेवकांकडून मला चांगली वागणूक मिळत नसल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. तसेच येत्या काळात मुख्यमंत्र्यांशी भेटून बोलणार असल्याचे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या