भिडे गुरुजींविरुद्ध बोलण्याची कोणाचीही लायकी नाही!

3

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

संभाजी भिडे गुरुजी हे वडिलधारी व्यक्ती आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. भीमा-कोरेगाव येथे जे घडले त्याच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही. भिडे गुरुजींविरुद्ध बोलण्याची कोणाचीही लायकी नाही, अशा स्पष्ट शब्दांत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी खडसावले. भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी चिथावणी दिल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह काहीजणांनी केला आहे. भिडे गुरुजी आणि एकबोटे यांच्या विरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. या संपूर्ण प्रकरणावर वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट भूमिका मांडली. उदयनराजे हे भिडे गुरुजींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.

काय म्हणाले उदयनराजे…
स्वराज्यासाठी त्याग करणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे श्रेष्ठ होते. त्यांचाही मान ठेवणार नसाल तर आपली लायकी काय आहे? भिडे गुरुजी हे वडीलधारी व्यक्ती आहेत. लोकांनी भिडे गुरुजींबद्दल तोंड संभाळून बोलावे. आपण कोणाबद्दल आणि काय बोलत आहोत याचे भान ठेवावे. भीमा-कोरेगाव येथे जे घडले त्याच्याशी भिडे गुरुजींचा संबंध नाही. भिडे गुरुजींविरुद्ध बोलण्याची कोणाचीही लायकी नाही. या घटनेनंतर भिडे गुरुजींशी आपण फोनवर बोललो. गुरुजी खूप भावनिक झाले होते. त्यांना रडू आले. माझ्या आयुष्याची आता कितीशी वर्षे राहिली आहेत आणि आता माझ्यावर असे आरोप होत आहेत हे दुःख त्यांनी बोलून दाखवले. मी त्यांना रडू नका असे सांगितले. भीमा-कोरेगावची घटना घडली तेव्हा भिडे गुरुजी होते किंवा नव्हते हे बघायला तिथे कोणी होते का? त्यावेळी नेमके काय आणि कसे घडले याचा विचार कोणी तरी केला आहे का? मिलिंद एकबोटेही हे माझे चांगले मित्र आहेत. जितेंद्र आव्हाड माझे मित्र आहेत. पण आपण काय बोलतो, कोणाशी बोलतो, कशासाठी बोलतो याचा त्याने विचार करायला हवा. मी या सगळ्य़ा प्रकारावर आमने-सामने चर्चा करायला तयार आहे. त्यांचे जे कोणी प्रमुख नेते आहेत त्यांनी मुंबई-पुण्यात कुठेही यायला सांगावे. मी तिथल्या तिथे सगळी उत्तरे देईन.

निवडणुका आल्याने हे सगळे सुरू आहे
मी कधीच जात-पात मानत नाही. काही राजकारण्यांनी आपल्या स्वार्थासाठी जात-पात निर्माण केली. आता निवडणुका आल्याने हे सगळे सुरू आहे असे उदयनराजे यांनी सांगितले. हा सगळा वाद अस्वस्थ करणारा आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. कारण हे असेच सुरू राहिले तर राज्याचेच नव्हे, तर देशाचे तुकडे होतील. देशाचे तुकडे बघण्यापेक्षा मी मरण पत्करेन असे ते म्हणाले.

शहरी विरुद्ध ग्रामीण वाद पेटला तर महागात पडेल
भीमा-कोरेगाव येथे नेमके काय घडले, कशामुळे घडले याचा कोणी विचार केला आहे का? कशाचीही खातरजमा न करता लोकांना भडकवले जात आहे. या सगळ्य़ा घडामोडींमुळे शेतकऱ्यांचे, ग्रामीण भागातील लोकांचे नुकसान झाले आहे. उद्या अन्य जातींमध्ये किंवा ग्रामीण विरुद्ध शहरी असा वाद पेटला तर तो किती महागात पडेल? त्यामुळे कारण नसताना उद्रेक होईल असे वक्तव्य कोणीही करू नये, असे आवाहन उदयनराजे यांनी केले.