देखणा दाढीवाला अर्थात मिस्टर बिअर्डसम

शुभांगी बागडे

महिलेचे सौंदर्य म्हटलं की आपल्यासमोर ठरावीक निकष येतातच. तिचा रेखीवपणा, कांती, तिचं असणं, दिसणं आणि अशा बरंच काही बद्दल उत्सुकता असतेच. आपलं रूप ठसठशीत दिसावं यासाठी तमाम महिलावर्ग सजग असताना पुरुष मात्र याबाबतीत काही पावलं मागेच दिसून येतात. आताशा मात्र ही परिस्थिती बदलत असल्याचं चित्र दिसत आहे अर्थात प्रत्येकाला मिलिंद सोमण बनण्याचे वेध लागलेत असंही नाही, परंतु प्रेझेंटेबल राहण्यासाठी पुरुषवर्ग व्यायाम, डाएट, लूक, ग्रुमिंग सेशन याचाही आधार घेताना दिसत आहे.

पुरुषांच्या सौंदर्याची परिभाषा अजूनही विशिष्ट कोषात अडकलेली आहे. याबरोबरच या सौंदर्याच्या अपेक्षांमध्ये सामाजिक पूर्वग्रहांचा भागही आहे. यामुळेच पुरुषांनी नेमकेच रंग वापरावेत, त्यांनी हाच पेहराव करावा इथपासून ते त्यांच्या दाढीमिशांची स्टाइल कशी असावी याचेही सामान्य निकष कित्येक वर्षे तेच आहेत. आता दाढीमिशांचा विषय निघाला आहेच तर देखणा दाढीवाला या स्पर्धेबाबत बोलायलाच हवं. दाढीमिशा ठसठशतपणे कोरून लूक अधिक मॅनली करत यातला स्टाइल सेन्स जपण्याचा प्रयत्न होताना दिसतोच. पण या जमवून आणलेल्या प्रयत्नांचं म्हणावं तितकं कौतुक होताना दिसत नाही. म्हणूनच अशा दाढीवाल्या देखण्या पुरुषांसाठी ब्य्रुइंग बिअर्ड (Brewing Beard) या फेसबुक पेजद्वारे दाढीवाला देखणा ही स्पर्धा आयोजित केली जाते.

नोव्हेंबर महिना गेल्या वर्षापासून अशा दाढीवाल्या देखण्यांसाठी खास ठरला आहे. महिलांच्या फॅशनचं, स्टाइल सेन्सचं पदोपदी कौतुक होताना दिसतं. आता पुरुषांनाही या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या दाढीमिशांचं कौतुक करून घेता येईल.

पुरुषांची हेअरस्टाइल वा दाढी याला फारसं महत्त्व कधीच नव्हतं. त्यातही दाढीमिशांची वेगळी स्टाइल असायला हवी, असा अट्टहासही नसायचा पण आता मात्र दाढीमिशांच्या स्टाइलकडे लक्ष दिलं जातं. दाढीमुळे आलेले देखणेपण तुम्हाला मान वळवायला लावतंच. अशा माचो दिसणाऱया दाढीवाल्या देखण्या पुरुषांसाठीच्या ब्य्रुईंग बिअर्ड #MrBeardsome अर्थात देखणा दाढीवाला या स्पर्धेने सध्या समस्त नेटीझन्सचं लक्ष वेधलं आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुस-या आठवडय़ापासून या स्पर्धेला सुरुवात झाली. दाढीवाले फोटो पाठवण्याबाबत या पेजद्वारे आवाहन करण्यात आलं आणि तमाम दाढीवाल्या पुरुषमंडळीने या स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला. पेजवर स्पर्धेत सहभागी पुरुषांचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो झळकू लागले आणि पेजच्या चाहत्यांनी आपल्या लाइक्स व शेअरनी विक्रमी प्रतिसाद दिला. स्पर्धा सुरू झाल्याच्या काही दिवसांतच या पेजला भेट देणाऱयांचा दोन लाखांचा आकडा सहज पार झाला होता. आतापर्यंत तीन लाखांहून अधिक फेसबुक युजर्सनी या पेजला भेट दिली असून दीड लाखाहून अधिक युजर्स लाइक्स, कमेंटस्, शेअरच्या स्वरूपात स्पर्धेशी निगडित झाले आहेत.

pic

मागील वर्ष हे या स्पर्धेचे पहिले वर्ष होते. त्या तुलनेत या वर्षी मिळालेला प्रतिसाद निश्चितच भारावणारा आहे, असे आयोजकांचे म्हणणे आहे.

या स्पर्धेत कोणाची दाढी चांगली हे कसं ठरवणार, हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर काही खास परीक्षक फोटोला मिळालेल्या लाइक्स व शेअरनुसार म्हणजेच मतांनुसार गुण देणार आहेत. यात परीक्षकांनी दिलेले वेगळे गुणही मोजले जाणार आहेत. उद्या सकाळी दहा वाजता हा दाढीवाला देखणा पुरुष खास अंदाजात जाहीर केला जाईल. स्पर्धेच्या निकालाअंती देखणा दाढीवाला म्हणजेच ‘मिस्टर बिअर्डसम’ या किताबासोबत रोख बक्षिसेसुद्धा दिली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्याचा दिवस आता उलटला असला तरी आपल्या लाइक्सने देखण्या दाढीवाल्यांना मत नोंदवता येईलच. निकाल जाहीर होण्यासाठी आता फार वेळ वाट पाहावी लागणार नाही. या स्पर्धेत 318 दाढीवाले स्पर्धक सहभागी झाले आहेत. यातील स्पर्धकांचा प्रचाराचा उत्साह राजकीय निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांनाही लाजवेल असा आहे. यात आयोजकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची. कारण वेगळ्या स्वरूपाच्या या स्पर्धेतील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी लागणाऱया पोस्टस्, कमेंट्स्, स्पर्धकांच्या व इतरांच्या प्रश्नांची उत्तरं यातलं संतुलन त्यांना राखलं आहे. यातल्या काही चुरचुरीत, चटपटीत पोस्टस्नी या पानाला वेगळी रंगत आली आहे.

महिलेचे सौंदर्य आणि पुरुषाचं कर्तृत्व ही तुलना आपल्याकडे केली जाते. मग पुरुषांनी सुंदर दिसायचं की नाही हा मुद्दा आहेच. पुरुषांनीही नव्या बदलांना स्वीकारत हा मुद्दा खोडून काढला आहेच. सुंदर दिसण्याच्या प्रयत्नांत महिलांप्रमाणेच तेही आघाडीवर असल्याचे चित्र आहे. याबाबत हेअर स्टाइलपासून ड्रेसिंग सेन्सपर्यंत वेगळेपण जपले जात असले तरी यात दाढीची मात्र काटछाटच झालेली दिसून येते. आतापर्यंत स्टाइल स्टेटमेंटच्या दृष्टीने दाढीच्या कोरीव कामाकडे फारसे लक्ष दिले गेलेले दिसत नव्हते. पण गेल्या दोन एक वर्षात मात्र दाढी वाढवण्याची फॅशन जोमात दिसून येतेय. दाढीबाबत पुरुषांच्या मतांप्रमाणेच मुलींकडूनही मत नोंदवलं जात आहे ते म्हणजे दाढीमिशांविना देखणा पुरुष म्हणजे आयाळाविना सिंह. दाढी वाढवण्याच्या या फॅशनला दुजोरा असणाऱया या महिलावर्गाने या स्पर्धेच्या पेजवरही विक्रमी प्रतिसाद नोंदवला आहे. अशा देखण्या पुरुषांना मत देण्यात त्याही मागे राहिल्या नाहीयेत हे विशेष.

वेगळ्या व भन्नाट कल्पनेवर आधारित या स्पर्धेच्या निमित्ताने फेसबुक वॉलवरही उत्साह दिसून येतोय. ब्य्रुइंग बिअर्ड स्पर्धेच्या निमित्ताने काही छानसं पाहायला मिळत आहे, हेही नसे थोडके. नाकीडोळा नीटस असाल नसाल तरीही तुमच्या रूपाला वेगळ्या अंदाजातला लूक चारचाँद लावतो. हॅण्डसम म्हणवून घेण्यासाठी इतकं तर करावंच लागतं. हॅण्डसमची हीच व्याख्या या स्पर्धेनिमित्त दाढीवाल्या पुरुषांनाही लागू पडतेय. अशा हॅण्डसम पुरुषांमधून कोण मिस्टर बिअर्डसम बनेल म्हणजेच कोण देखणा दाढीवाला ठरेल हे पाहायलाच हवे.

लिंकः https://www.facebook.com/MrBrewingBeard/

#देखणा_दाढीवाला #MrBeardsome