धोनीचा आणखी एक विक्रम, ‘द वॉल’ला पछाडत पोहचला दुसऱ्या स्थानावर


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. धोनीने माजी खेळाडू ‘द वॉल’ राहुल द्रविड याला मागे सारत हिंदुस्थानकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्यांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. रविवारी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात धोनीने हा विक्रम केला.

दुबईमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलेला सामना धोनीचा 505 वा आंतरराष्ट्रीय सामना होता. राहुल द्रविड याने हिंदुस्थानकडून 504 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या यादीमध्ये मास्टर ब्लास्टर आणि शतकांचा बादशहा सचिन तेंडुलकर 664 सामन्यांसह पहिल्या स्थानावर आहे.

आशिया कपसाठी निवडण्यात आलेल्या हिंदुस्थानी संघातील धोनी सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याचा अनुभव अनेकदा मैदानावर दिसून आला आहे. धोनीने 505 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 16268 धावा चोपल्या आहेत. यात त्याच्या 15 शतकांचा आणि 105 अर्धशतकांचा समावेश आहे. धोनीने डिसेंबर 2014 मध्ये कसोटी क्रिकटमधून निवृत्ती घेतली. तोपर्यंत त्याने 90 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले होते. तसेच धोनीने आतापर्यंत 322 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि 93 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत.

धोनीने हिंदुस्थानसाठी सर्वाधिक 331 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची भूमिका सांभाळली आहे. या दरम्यान त्याने हिंदुस्थानला एक दिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि वर्ल्ड टी-20 चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकून दिली.

हिंदुस्थानकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे खेळाडू
सचिन तेंडुलकर – 664 सामने (200 कसोटी, 463 वन डे आणि एक टी-20)
एम. एस. धोनी – 505 सामने (90 कसोटी, 322 वन डे आणि 93 टी-20)
राहुल द्रविड – 504 सामने (163 कसोटी, 340 वन डे आणि एक टी-20)
मोहम्मद अझरुद्दीन – 433 सामने (99 कसोटी आणि 334 वन डे)
सौरव गांगुली – 421 सामने (113 कसोटी आमि 308 वन डे)