वीज कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला लाच घेताना पकडले

प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । इचलकरंजी 

 येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महाकंपनीच्या उप कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना कोल्हापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले.  वीज ग्राहकाकडून अपार्टमेंटकरीता वीज जोडणीचे कनेक्‍शनला मंजूरी देण्यासाठी २५ हजार रूपयाची लाच त्यांनी मागितली होती. ती स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले.

रणजीत बाळासो पाटील (मुळ रा. खोची, ता. हातकणंगले, सध्या रा. कसबा बावडा, कोल्हापूर) असे लाचखोर उप कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणाची नोंद करण्याचे काम गावभाग पोलिसात सुरु आहे. लाचखोर अभियंता रणजीत पाटील एक वर्षापूर्वीच पेठवडगावहून येथील स्टेशन रोडवरील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महाकंपनीच्या कार्यालयामध्ये बदलीहून आले आहेत. त्यांच्याकडे येथील गर्व्हेमेंट कॉन्ट्रॅक्‍टर उमेश निशिकांत माळी (रा. काडापूरे तळ, इचलकरंजी) यांनी सहा महिन्यापूर्वी शहरातील सप्तसागर व राधाकृष्ण डेव्हलपर्सच्या अपार्टमेंटमध्ये वीज कनेक्‍शन मिळावे या करीता अर्ज केला होता.

हा अर्ज मंजूर करण्यासाठी पाटील याने माळी याच्याकडे २७ हजार रूपयाची लाच मागितली होती. तडजोडी अंती २५ हजार रूपयावर व्यवहार ठरला. या ठरलेल्या व्यवहाराची रक्कम आज दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास पाटील येथील स्टेशन रोडवरील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात घेत असताना कोल्हापूर लाच लुचपत विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडून अटक केली. कार्यालयात लाच लुचपत विभागाने उपकार्यकारी अभियंता पाटील याला पकडले असल्याची माहिती पसरताच कार्यालयात एकच खळबळ उडाली.