तहानेने व्याकूळ झालेल्या गावांना एसटीचा आधार, नऊ जिल्ह्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

80

सामना प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील तहानेने व्याकूळ झालेल्या बळीराजाच्या मदतीला एस.टी. महामंडळ सरसावले आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांतील 19 गावांत एसटी महामंडळाने पाणी पुरवण्याची सामाजिक जबाबदारी उचलली असून बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी, ‘व्यथा तुमची, जाण माझी’ या न्यासा अंतर्गत रविवार 19 तारखेपासून पाणी पुरवण्याच्या या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गावांतील पाण्याची समस्या संपेपर्यंत हे टँकर सुरू राहणार आहेत.

अन्नदाता शेतकरी दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे अडचणीत असून त्यांची तहान भागवण्यासाठी एस.टी. महामंडळाने पिण्याच्या पाण्याचे टँकर थेट त्यांच्या गावांमध्ये पोहोचवण्याची अनोखी मोहीम सुरू केली आहे. दुष्काळात पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या गावकऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने 19 मेपासून दररोज हे पाण्याचे टँकर देणे सुरू केले आहे. बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी, ‘व्यथा तुमची, जाण माझी’ या न्यासा अंतर्गत महामंडळाने हे पाणीवाटप सुरू केले आहे. त्यासाठी महामंडळाने वेगळी तरतूद केलेली नाही. केवळ डिझेलसाठी येणारा खर्च महामंडळाने उचलला आहे. पहिल्या टप्प्यात नांदेड, हिंगोली, परभणी, संभाजीनगर, धाराशीव, बुलडाणा, नाशिक, नगर आणि सातारा जिह्यांतील अतिटंचाईच्या गावांना गरज संपेपर्यंत पिण्याचे पाणी पुरविले जाणार आहे. महामंडळाकडे स्वतःच्या मालकीच्या विहिरी आणि कुपनलिका असून त्याद्वारे हा पाणीपुरवठा केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या