मुकेश अंबानी दिवसाला कमावतात 300 कोटी रुपये!


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशातील सगळ्यात श्रीमंत उद्योगपती असलेले रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी गेल्या वर्षीपासून दरदिवसाला 300 कोटींची कमाई करत आहेत. ‘बार्कलेज हुरुन इंडिया रिच लिस्ट 2018’ मध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मुकेश अंबानी 3 लाख 71 हजार कोटी रुपये संपत्तीसह सलग सातव्यावर्षी हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत उद्योगपती पदावर कायम आहेत. एका वर्षात त्यांच्या कंपनीच्या शेअरचे भाव 45 टक्क्यांनी वाढले आहेत.

‘बार्कलेज हुरुन इंडिया रिच लिस्ट 2018’ मध्ये हिंदुस्थानातील एक हजार कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या श्रीमंतांच्या नावाचा समावेश आहे. यात मुकेश अंबानी प्रथम स्थानावर असून एस.पी. हिंदुजा कुटुंब, एल.एन. मित्तल कुटुंब आणि अजीम प्रेमजी यांच्या नावाचा समावेश आहे. 2018 च्या यादीत गेल्यावर्षीपेक्षा एक तृतीयांश जास्त लोकांचा समावेश झाला आहे. 2017 मध्ये या यादीत 617 जण होते. तर यंदा यादीत 831 जणांचा समावेश झाला आहे.

या यादीत सन फार्माचे दिलीप संघवी पाचव्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती 89 हजार 700 कोटी रुपये आहे. त्यांच्याखालोखाल कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक सहाव्या स्थानावर आहेत. तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे एस. पूनावाला सातव्या स्थानावर आहेत. त्यानंतर गौतम अदानी, साइरस पालनजी यांचे नाव यादीत आहे. तसेच गोदरेज, हिंदुजा, मिस्त्री, संघवी, नाडर, अदानी, लोहिया आणि बर्मन या परिवारांचाही यादीत समावेश आहे.