मोदी सरकारवर नाराज मुकेश खन्नांचा सीएफएसआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मोदी सरकारच्या धोरणांविरोधात नाराजी व्यक्त करत प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांनी चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीच्या (सीएफएसआय) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुकेश खन्ना यांची तीन वर्ष कार्यकाळासाठी चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात त्यांना तीन वर्ष पूर्ण होणार आहेत, मात्र दोन महिने आधीच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या कारभारामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

बीआर चोपडा यांच्या ‘महाभारत’ आणि ‘शक्तिमान’ या मालिकांमधून प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेल्या मुकेश खन्ना यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयावर फंड न देण्याचा आरोप लावला आहे. चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीमध्ये पैशांची कमी आणि अध्यक्षपदामध्ये रुची न राहिल्याने राजीनामा दिल्याचे खन्ना यांनी सांगितले. ‘द प्रिंट’ने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीसाठी फंडची मागणी केली होती, मात्र मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, असे मुकेश खन्ना यांनी सांगितले. त्यामुळे याविरोधात मी माझा राजीनामा संबंधीत मंत्रालयाकडे पाठवला आहे, असेही ते म्हणाले. सोबतच त्यांनी आपण या कामासाठी जास्त उत्सूक नसल्याचेही म्हटले. चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीमध्ये काम करणाऱ्या मुलांनी त्यांनी भुमीका निभावलेला चित्रपट अद्याप पाहिलेला नाहीत. हे चित्रपट फक्त फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यासाठी तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी लगावला.